अब्दुल कादर मुकादम

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अब्दुल कादर मुकादम

अब्दुल कादर मुकादम हे राजकीय, सामाजिक घडामोडींचे अभ्यासक असून मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे १४ जून १९३० रोजी त्यांचा जन्म झाला. मुंबईच्या सेंट झेवियर्स काॅलेजमधून त्यांनी तत्त्वज्ञान विषय घेऊन बीए केले, व यानंतर पुणे विद्यापीठातून मराठी साहित्यात एमए केले.

मुकादम हे १९७०पासून महाराष्ट्रातील सुधारणावादी चळवळीत सक्रिय आहेत. मुस्लिम समाजामध्ये वैचारिक परिवर्तनाची गरज आहे या जाणिवेतून देशातील विविध पुरोगामी संस्था व चळवळीशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले आहे. हमीद दलवाईंनी स्थापन केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या पत्रिकेचेही त्यांनी काही वर्षे संपादन केले. दलवाईंच्या निधनानंतर ते बरीच वर्ष सत्यशोधक मंडळात कार्यरत होते. कालांतराने वैचारिक मतभेद झाल्याने ते बाहेर पडले.

अब्दुल कादर मुकादम यांनी मुस्लिम सधारणावादी चळवळीतील अनेक दिग्गजांसोबत काम केले आहे. त्यात कायदेतज्ज्ञ ए.ए.ए. फैजी, मोईन शाकीर, असगरअली इंजिनिअर, प्रा. फकरुद्दीन बेन्नूर, दाऊद दळवी आदींसोबत त्यांची चांगले संबंध होते. याशिवाय नरहर कुुरुंदकर, वसंत पळशीकर, भाई वैद्य यांच्याशीदेखील त्यांचे मैत्रीचे नाते होते. स्वातंत्र्योत्तर काळातील मुस्लिम समाजाचे प्रश्न, जातीयवाद, दहशतवाद, भारताचा मध्ययुगीन इतिहास, जमातवादी राजकारण, आधुनिक भारत आदी त्यांच्या अभ्यासाचे व चिंतनाचे विषय आहेत. इस्लामी धर्मशास्त्र, न्यायशास्त्र, परंपरा आणि इतिहास याचा व्यासंगपूर्ण व संशोधनात्मक अभ्यास करणे त्यांचा विशेष आवडीचा विषय राहिला आहे.

मुकादम इस्लामचे तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जातात. न्यूझ चॅनलच्या पॅनल चर्चेतून ते सतत प्रेक्षकांना भेटी देत असतात. सन २०१९ मध्ये त्यांचे बहुचर्चित 'इस्लाम ज्ञात आणि अज्ञात' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, इस्लामवर भाष्य करणारा मराठीत लिहिला गेलेला हा एकमेव ग्रंथ आहे. यापूर्वी इस्लामविषयीचे अनेक ग्रंथ अनुवादित स्वरूपात उपलब्ध होते. इस्लाम, मुस्लिम समाज आणि मुस्लिम राजकारणावर त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. लोकमत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, प्रहार, मुक्तशब्द, सत्याग्रही विचारधारा आदी दैनिकांत व मासिकांत त्यांचे दोनशेपेक्षा जास्त लेख प्रकाशित झाले आहेत. याशिवाय ते महाराष्ट्र पातळीवर अनेक व्याख्याने देत असतात. तसेच प्रशिक्षण शिबिरेही घेतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →