अनोखेलाल मिश्र

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अनोखेलाल मिश्र

भारतीय तबलावादक. त्यांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसीजवळील ताजपूर, सकलडीहा येथे झाला. त्यांचे वडील बुद्धूप्रसाद मिश्र सारंगीवादक होते. त्यांच्या घरी संगीताची परंपरा होती. अनोखेलाल यांच्या बालपणीच त्यांचे आईवडील निवर्तले. त्यामुळे त्यांचे संगोपन त्यांची आजी जानकीबाई यांनी केले. अनोखेलाल यांना तबलावादनाचे शिक्षण मिळावे याकरिता त्या बनारसला आल्या. त्यांचे बालपण कष्टप्रद होते.



अनोखेलाल यांना लहानपणापासून सुमारे पंधरा वर्षे बनारस घराण्याचे पं. भैरवप्रसाद मिश्र यांच्याकडून तबलावादनाची तालीम मिळाली. योग्य गुरूंची तालीम व कठोर रियाझ यांमुळे अल्पावधीतच त्यांनी नाव कमावले. लवकरच त्यांना आकाशवाणीवरही वादनाकरिता बोलाविण्यात आले. त्यांचे तबलावादन वैशिष्ट्यपूर्ण होत असे. बनारस घराण्याचे खास तबलावादन त्याचबरोबर दिल्लीसहित अन्य घराण्यांचे कायदे शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सादर करीत. तबलावादनाची विलक्षण तयारी व बोलांची स्पष्टता यांवर त्यांचे प्रभुत्व होते. अनेक संगीतसंमेलनांत विविध कलावंतांची साथसंगत त्यांनी उत्तमप्रकारे केली. तसेच तबलावादनाच्या जुगलबंदीचेही सादरीकरण केले. १९४७ मध्ये आरा कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेली प्रस्तुती खूप गाजली. अनोखेलाल भारतीय सांस्कृतिक मंडळासोबत अफगाणिस्तानला गेले असता, तेथील शाह जहीरशाहने त्यांना ‘मौसिकी तबला नवाज’ हा किताब देऊन गौरविले (१९५२). भारत सरकारने त्यांना संस्कृती दूत म्हणून नेपाळलाही पाठविले होते. कोलकात्यातील अखिल भारतीय संगीत संमेलनात त्यांना ‘संगीत रत्न’ ह्या उपाधीने गौरविण्यात आले.

शिस्तबद्ध पद्धतीने कायदे वा चलन वाजविणे आणि त्यांचा शास्त्रशुद्ध व दीर्घ विस्तार करणे ही अनोखेलाल यांची मुख्य वादनवैशिष्ट्ये होत. पं. रविशंकर, उस्ताद अली अकबरखाँ यांचे ते आवडते संगतकार होते. प्रखर रियाझाने त्यांनी दमसास कमावलेला असल्याने शेवटच्या पलट्यापर्यंत त्यांच्या वादनात सशक्तपणा असे. सर्वांत कठीण असा एकबोटी “धा धीं धीं धा’ हा तीन तालाचा (त्रिताल) ठेका अत्यंत लयीत ते अर्धा-अर्धा तास अविश्रांतपणे वाजवीत.

अनोखेलाल यांचा विवाह चंद्रकलीदेवी यांच्याशी झाला. त्यांना रामजी, काशीनाथ व शकुंतला ही मुले.

अनोखेलाल यांचे स्वतंत्र तबलावादनही अतिशय कर्णमधूर होत असे. बनारस घराण्याच्या श्रेष्ठ तबलावादकांपैकी ते एक समजले जातात. त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र पं. रामजी मिश्र, काशीनाथ मिश्र आणि शिष्य रामसुमेर मिश्र, नागेश्वरप्रसाद मिश्र, महापुरुष मिश्र, ईश्वरलाल मिश्र, छोटेलाल मिश्र इत्यादींनी पुढे नेला.

१९५६ पासून ते गँगरिनमुळे आजारी होते. त्यातच त्यांचे काशी येथे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →