जनरल अनिल चौहान (१८ मे १९६१) हे भारतीय लष्कराचे चतुर्थ तारांकित जनरल आणि माजी सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ३० सप्टेंबर २०२२ पासून ते भारतीय सशस्त्र दलांचे दुसरे संरक्षण दलप्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ - CDS) म्हणून कार्यरत आहेत.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी असलेल्या चौहान यांना १९८१ मध्ये ११ व्या गोरखा रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले होते. त्यांची चार दशकांची लष्करी कारकीर्द आहे. नंतरच्या वर्षांच्या सेवेदरम्यान चौहान यांनी सुरुवातीला बारामुल्ला येथील उत्तर कमांडच्या पायदळ विभागाचे प्रमुख जनरल म्हणून कमांडिंग केले; नंतर लेफ्टनंट जनरलच्या क्षमतेनुसार २०१७ ते २०१८ पर्यंत नागालँड-आधारित तिसऱ्या कोरचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम केले.
जानेवारी २०१८ मध्ये त्यांची मिलिटरी ऑपरेशन्सचे महासंचालक (DGMO) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, ज्या दरम्यान त्यांनी दोन प्रमुख लष्करी ऑपरेशन्सच्या अंमलबजावणीवर देखरेख केली : २०१९ चा पाकिस्तानविरुद्ध बालाकोट हवाई हल्ला (एर स्ट्राइक) आणि ऑपरेशन सनराईज - भारत-म्यानमार यांचा बंडखोरी विरुद्ध एक संयुक्त स्ट्राइक.
सप्टेंबर २०१९ मध्ये, अनिल चौहान यांची पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (GOC-in-C) म्हणून नियुक्ती करण्यात आली; तेव्हा त्यांचे पूर्ववर्ती मनोज मुकुंद नरवणे, तत्कालीन लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मे २०२१ मधील त्यांच्या निवृत्तीपर्यंत चौहान या पदावर कार्यरत होते. सक्रिय लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर चौहान यांनी अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) चे लष्करी सल्लागार म्हणून काम केले.
२८ सप्टेंबर २०२२ रोजी, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने अनिल चौहान यांची द्वितीय भारतीय संरक्षण दलप्रमुख (CDS) म्हणून नियुक्ती केली. चतुर्थ तारांकित हुद्द्यावर नियुक्त केलेले ते पहिले तृतीय तारांकित सेवानिवृत्त अधिकारी आहेत. अनिल चौहान यांनी जनरल बिपिन रावत यांच्यानंतर पदभार स्वीकारला, ज्यांचे नऊ महिन्यांपूर्वी डिसेंबर २०२१ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
अनिल चौहान
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.