अतिसूक्ष्मतंत्रज्ञान

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

अतिसूक्ष्मतंत्रज्ञान

अतिसूक्ष्मतंत्रज्ञान ही उपयोजित शास्त्राची आणि तंत्रज्ञानाची एक शाखा आहे. ह्यात प्रामुख्याने अणू अथवा रेणूंच्या आकाराइतक्या सूक्ष्म प्रमाणावर पदार्थांच्या नियंत्रणाचा अभ्यास होतो. पदार्थांचे साधारणपणे १ ते १०० नॅनोमीटर एवढ्या लहान प्रमाणात नियंत्रण करण्यासाठी अतिसूक्ष्म आकारातील साधने तयार करणे याचाही समावेश यात होतो.

अतिसूक्ष्मतंत्रज्ञान हे 'भविष्यातील मूलभूत तंत्रज्ञान' म्हणून मानले जाते. हे एक अत्याधुनिक, आणि जगभरात अतिशय झपाट्याने विकसित होत असलेले असे तंत्रज्ञान आहे.

या तंत्रज्ञानाचा चरम उद्देश, केवळ प्रचलित यंत्रांचे किंवा पदार्थांचे अतिसूक्ष्मीकरण करणे हा नसून, अतिसूक्ष्म लांबन पातळीवर ज्या नवीन भौतिकीय घटना घडतात आणि ज्या साधारण पातळीवर प्रकट होत नाहीत, अशा घटनांचा वापर करून नवीनतम यंत्ररचना तयार करणे हा होय. सद्य परिस्थितीमध्ये हा चरम उद्देश साध्य करण्याइतपत तंत्रज्ञान मानवाजवळ नाही. या तंत्रज्ञानाबाबत जी प्रचंड गुंजारव आपल्याला बघायला मिळते, त्यामध्ये मुख्यत्वेकरून प्रचलित पदार्थांचे अतिसूक्ष्मीकरण केल्यास त्या पदार्थाला जे नवीन अद्भुत गुणधर्म प्राप्त होतात, त्यांचा वापर केला जातो. उदा. सोने हा धातू साधारण अवस्थेत रासायनिक प्रक्रियेस मदत करीत नाही, पण त्याचेच जर अतिसूक्ष्मीकरण (१०० नॅनोमीटर हून सूक्ष्म चूर्ण) केले तर तो अतिशय सक्रियपणे रासायनिक प्रक्रियेस मदत करतो.

पदार्थांचे अतिसूक्ष्मीकरण करणे ही या तंत्रज्ञानाची केवळ पहिली पायरी आहे, आणि या पहिल्या पायरीनेच सर्वत्र अतिशय खळबळ आणि कुतुहल निर्माण केले आहे. इतकेच नव्हे, तर अनेक नवीन वैज्ञानिक प्रकल्पांचे आणि शैक्षणिक अभ्यासक्रमांचे जनन केले आहे. जगातील मोठमोठ्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये या तंत्रज्ञानाच्या अभ्यासावर प्रचंड भर दिला जात आहे.

एक नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा शंभर कोटिवा हिस्सा. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे झाल्यास, असे म्हणता येईल, की एका खेळण्यातल्या गोटीच्या आकारची तुलना पृथ्वीच्या आकाराशी केली तर ते एका नॅनोमीटरची एका मीटरशी तुलना केल्यासारखे होईल. इतक्या सूक्ष्म वस्तूंना नियंत्रित करणे ही महत्कठीण अशी एक बाब आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →