ॲलन रिकमन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

ॲलन रिकमन

ॲलन सिडनी पॅट्रिक रिकमन (२१ फेब्रुवारी, १९४६ - १४ जानेवारी, २०१६) हे एक इंग्लिश अभिनेते आणि दिग्दर्शक होते. हॅरी पॉटर शृंखलेतील प्रोफेसर सिव्हिरस स्नेपची त्यांची भूमिका विशेष गाजली. त्यांनी डाय हार्ड, रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्स, ट्रूली, मॅडली, डीपली आणि हॅरी पॉटर शृंखलेतील चित्रपटांसह ५० पेक्षा अधिक चित्रपटांत अभियन केला होता.

आपल्या खोल आणि शांत आवाजासाठी ओळखले जाणाऱ्या रिकमन यांनी लंडनच्या RADA (रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट) येथे शिक्षण घेऊन आधुनिक तसेच शास्त्रीय नाटकांत काम सुरू केले. ते पुढे रॉयल शेक्सपियर कंपनी (RSC) चे सदस्य बनले.

डाय हार्ड (१९८८) मध्ये जर्मन दहशतवादी नेता हंस ग्रुबर ही त्यांची पहिली सिनेमा भूमिका होती. रॉबिन हूड: प्रिन्स ऑफ थीव्हज (१९९१) मध्ये ते नॉटिंगहॅमचा शेरीफ म्हणून दिसले. यासाठी त्यांना सहाय्यक भूमिकेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार मिळाला. सेन्स अँड सेन्सिबिलिटी (१९९५) मधील कर्नल ब्रॅंडन आणि मायकेल कॉलिन्स (१९९५) मधील इमॉन डी व्हॅलेरा (१९९५) मधील सहाय्यक भूमिकांसाठी त्यांचे कौतुक झाले. ट्रूली, मॅडली, डीपली (1991) आणि अॅन अव्हफुली बिग अॅडव्हेंचर (१९९५) मधील प्रमुख भूमिकांसाठी त्यांनी समीक्षकांचे लक्ष वेधले. डॉग्मा (१९९९), गॅलेक्सी क्वेस्ट (१९९९), आणि द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी (२००५) मधील विनोदी भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांनी हॅरी पॉटर मालिकेत (२००१-११) सिव्हिरस स्नेपची भूमिका केली. यादरम्यान ते लव्ह अ‍ॅक्चुअली (२००३), स्वीनी टॉड: द डेमन बार्बर ऑफ फ्लीट स्ट्रीट (२००७) आणि अॅलिस इन वंडरलँड (२०१०) मध्ये दिसले. CBGB (२०१३), आय इन द स्काय (२०१५), आणि अॅलिस थ्रू द लुकिंग ग्लास (२०१६) मध्ये त्यांनी अंतिम चित्रपट भूमिका केल्या.

रिकमन यांनी बीबीसीच्या शेक्सपियर मालिकेचा एक भाग म्हणून रोमियो अँड ज्युलिएट (१९७८) मध्ये टायबाल्टची भूमिका करून दूरदर्शनवर पदार्पण केले. द बारचेस्टर क्रॉनिकल्स (१९८२) च्या बीबीसी मालिकेतील ओबादिया स्लोप ही त्यांचा महत्त्वपूर्ण भूमिका होती. नंतर त्यांनी दूरदर्शन चित्रपटांमध्ये भूमिका केली. रासपुटिन: डार्क सर्व्हंट ऑफ डेस्टिनी (१९९६) मधील त्यांचे शीर्षक पात्र विशेष गाजले. या भूमिकेने रिकमन यांना गोल्डन ग्लोब पुरस्कार, एमी पुरस्कार आणि स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि समथिंग द लॉर्ड मेड (२००४) मध्ये अल्फ्रेड ब्लॅक पुरस्कार मिळवून दिले.

२००९ मध्ये, द गार्डियनने रिकमन यांना कधीही अकादमी पुरस्कार नामांकन न मिळालेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून नाव दिले. १४ जानेवारी २०१६ रोजी वयाच्या ६९ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने रिकमन यांचे निधन झाले. ३० एप्रिल २०२३ रोजी, गुगलने डुडलद्वारे रिकमनचे स्मरण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →