स्ट्राँबोली ज्वालामुखी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

इटलीलगतच्या टिरीनियन समुद्रातील स्ट्राँबोली या बेटावरील एक जागृत ज्वालामुखी. टिरीनियन हा भूमध्य समुद्राचा भाग आहे. इटलीच्या सिसिली बेटाच्या ईशान्येस असलेल्या लिपारी

द्वीपसमूहात या नावाचे बेट असून त्यावरच स्ट्राँबोली ज्वालामुखी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १२ चौ. किमी. असून तेथील लोकसंख्या सुमारे ५०० आहे (२०१८). प्रशासकीय दृष्ट्या हे बेट सिसिलीच्या मेसीना प्रांतात येते. या बेटाचा मूळ पृष्ठभाग टिरीनियन समुद्रात स. स. पासून १,००० मी. खोलीवर होता. स्टाँबोली ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लाव्हारसाच्या सततच्या संचयनामुळे आज या बेटाची उंची स. स. पासून ९२६ मी. झाली आहे. बेटाचे भूकवच पोटॅशियमयुक्त बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. येथे अंतर्वेशी अग्निज खडक प्रकारांपैकी भित्ती (डाईक) प्रकारचे खडक आढळतात.

जगातील सतत जागृत असणाऱ्या ज्वालामुखींपैकी स्ट्राँबोली हा एक आहे. सुमारे १,००० वर्षांपूर्वीपेक्षा अधिक कालावधीपासून याच्या उद्रेकाच्या नोंदी मिळतात. येथील पहिला उद्रेक सुमारे दोन लाख वर्षांपूर्वी झाला असावा. याचे स्थान

आफ्रिकन आणि युरेशियन भूपट्टांच्या सरहद्दीवर आहे. १९३२ पासून स्ट्राँबोलीच्या ज्वालामुखी कुंडातून सातत्याने साधारण १५ ते २० मिनिटांच्या अंतराने लाव्हारस बाहेर येऊन सभोवतालच्या सागरी भागात पसरतो. हा केंद्रीय प्रकारचा ज्वालामुखी असून त्यातून अचानक मोठे उद्रेक न होता सातत्याने तप्त लाव्ह्याचे लहानमोठे थेंब, गोळे किंवा कारंजे वर उडून त्याचा प्रकाशमान फवारा दिसतो. उद्रेकाच्या या विशिष्ट प्रकारच्या क्रियेवरून स्ट्राँबोली हा ज्वालामुखीचा एक प्रकारही मानला जातो. ज्वालामुखी कुंडातून बाहेर येणारा लाव्हारस सहज रीत्या वाहून जात असल्यामुळे क्वचितच तो आपत्तिकारक ठरतो. अलीकडील काहीसे आपत्तिकारक उद्रेक सन १९२१, १९३०, १९३२, १९६६, २००२, २००३, २००७ मध्ये झाले होते. रात्रीच्या वेळी दूरवरून त्याच्या उद्रेकाचे दृश्य दिसते. याला ‘भूमध्य समुद्रातील दीपगृह’ असे म्हणतात. यास व आसपासच्या बेटांना युनेस्कोने २००० मध्ये जागतिक वारसास्थळात सामील केले आहे. स्ट्राँबोली बेट व ज्वालामुखी हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असून स्ट्राँबोलीच्या उद्रेकाचे दृश्य पाहण्यासाठी, येथील हवामान अनुभवण्यासाठी आणि बेटाच्या किनाऱ्यावरील पुळणींवर आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येथे पर्यटक येत असतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →