सौंदर्यस्पर्धाला इंग्रजी मध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट/पॅजन्ट असे म्हणतात. स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा. व्यक्तीचे सौंदर्य, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन इत्यादींना या स्पर्धेत महत्त्व असते.
प्राचीन काळी अनेक राजांच्या राण्यांमध्येदेखील अशा सौंदर्यस्पर्धा होत असत. मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये आवडती राणी शोधण्यासाठी राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी व तत्संबंधीच्या नियमांविषयीची माहिती आढळते. ऑटोमन साम्राज्यामध्ये इस्लामिक नियम कितीही कडक असले, तरी त्याहीवेळेला सरदार व राज्यांमधील प्रतिष्ठित लोकांच्या घरी अशा सौंदर्यस्पर्धा घेतल्या जात. यूरोपमध्ये अतिप्राचीन काळी ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे शिल्पकार, कवी, बुद्धिवंत, नेते आणि सेनापती असत. सध्याच्या गिनी बिसाऊ या देशातील व्हीझगॉश बेटावर सौंदर्यस्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आयोजित होत असत.
यूरोपमध्ये पहिली मोठी सौंदर्यस्पर्धा सप्टेंबर १८८८ मध्ये झाली. बेल्जियम रिसॉर्ट स्पामध्ये ती आयोजित केली होती. त्यामध्ये एकवीस स्पर्धकांना बंद घोड्याच्या गाडीतून ( बग्गीतून ) आणले गेले. बाहेरच्या कोणत्याही लोकांना आत येण्यास परवानगी नव्हती. स्पर्धकांचे फोटो निर्णायकांना पाठवले गेले. ह्यांमध्ये ग्वादलूप शहरातील अठरा वर्षांची स्पर्धक मार्थे सॉकरेत हिला पाच हजार फ्रँकचे बक्षीस दिले गेले. जर्मनीमधील पहिली सौंदर्यस्पर्धा १९०९ मध्ये झाली. या स्पर्धेची विजेती एकोणीस वर्षांची गर्ट्रड दॉपिएरलस्की ही पूर्व प्रशियामधील होती.
सौंदर्यस्पर्धा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?