सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. परिपक्व आलं (सोलून किंवा न सोलता) १० % चुन्याच्या पाण्यात 12 तास भिजत ठेवून सुकविले की सुंठ तयार होते....चुन्याचे प्रमाण किती घ्यायचे ते आपल्यावर अवलंबून आहे.काही भागात उकळत्या चुन्याच्या पाण्यात आलं टाकून सुंठ तयार केली जाते.....सुंठ किंवा सुंठीची पूड हा एक गुणकारी औषधी पदार्थ आहे. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो. सुंठीची कढी ही अतिसाराच्या विकारावर गुणकारी ठरते.
आले वाळवल्याने सुंठ तयार होते. त्यामुळे आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. सुंठेत ‘उदरवातहारक' गुण असल्याने जुलाबाच्या (विरेचन) औषधामध्ये ती मिसळतात. पचन संस्थेसाठी सुंठ उपयुक्त आहे. वृद्धावस्थेत पचननिक्रिया साधारणत: मंदावते, पोटात वायू निर्माण होतो, कफप्रकोप होतो, हृदयात धडधड होते, हात-पाय दुखतात. अशा स्थितीत सुंठेचे चूर्ण दुधातून घेणे फायदेशीर असते. कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसेच हृदयविकाराच्या रुग्णांसाठी सुंठ उपयोगी असते. सुंठेमध्ये अनेक उत्तम गुणधर्म असल्यानेच तिला ‘महौषधी' असे नाव देण्यात आलं आहे. ती पाचक, चवीला तिखट, हलकी, स्निग्ध आणि उष्ण असते. कफ, वायू आणि बद्धकोष्ठतेचा त्रास सुंठेमुळे दूर होतो.
सुंठ तशी सर्वांच्याच परिचयाची आहे. आमटीत-भाजीतही तिचा उपयोग केला जातो, मात्र गोड पदार्थ खास करून चण्याच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या गोड पदार्थाच्या पाककृती करताना जास्त उपयोग होतो. कोणताही पदार्थ बाधू नये, नीट पचावा, गॅसेसचा त्रास होऊ नये म्हणून गोड पदार्थात सुंठीची पूड घातली जाते. सुंठीचा वापर ‘पुरणपोळी' आणि ’आमरसात' केला जातो. कारण या दोन्ही पदार्थांमुळे गॅसेसचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. हा त्रास टाळण्यासाठी आमरसात आणि पुरणपोळीत सुंठ-तूप घालण्याचा प्रघात आहे. आता केवळ खाद्यपदार्थ शरीराला त्रासदायक होऊ नयेत, म्हणून सुंठीचा वापर केला जात नाही, तर पदार्थाचा दर्जा वाढावा, तो जास्त दिवस टिकावा म्हणूनही सुंठीचा उपयोग केला जातो.
सुंठ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.