संगमनेर तालुका

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

संगमनेर तालुका

नद्या - प्रवरा, मुळा, म्हाळुंगी,आढळा , कच

संगमनेर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. संगमनेर शहर येथे तालुक्याचे मुख्यालय आहे.

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे इसवी सनपूर्व १५०० या काळातील पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

अहिल्यानगर शहरानंतर संगमनेर हे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ते मोठ्या बाजारपेठ (कापड, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, दागिने) तसेच शैक्षणिक सुविधा, दूध प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे. संगमनेर हे जिल्ह्याचे "हॉस्पिटल हब" म्हणूनही ओळखले जाते. शहर मध्यवर्ती ठिकाणी (मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या मध्यभागी आहे) आणि पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील नाशिकपासून फक्त दोन तासावर आहे. ऊस लागवडीसाठी आधीच प्रसिद्ध असलेल्या संगमनेरला आता टोमॅटो तसेच डाळिंबाचे केंद्र म्हणूनही ओळखले जाते.

संगमनेरची 'कृषी उत्पन्न बाजार समिती' ही देशातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानली जाते. संगमनेर हे जिल्ह्यातील बहुतेक रहदारीचे शहर म्हणून ओळखले जाते आणि आता नाशिक पुणे रेल्वेमार्गाचे संगमनेर शहर येथे स्थानक प्रस्तावित आहे. मध्यवर्ती स्थानामुळे, शहरातील बसस्थानक २४ तास उच्च पातळीवर सार्वजनिक वाहतुकीसह खुले आहे. संगमनेर येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसस्थानक हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात हायटेक बसस्थानक आहे. राज्य सरकारच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक - २०२४ अभियानात अ वर्ग बसस्थानक या प्रकारात संगमनेर बसस्थानकास तृतीय क्रमांक मिळाला आहे. गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशच्या बसेसही दररोज येथे येतात.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या गावात महाराष्ट्रातील सर्वात मोठा व भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महाकाय वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष जवळपास तीन एकर मध्ये पसरलेला आहे. या वटवृक्षाला पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येतात.

पेमगिरी गावातील शहागड या ठिकाणी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांनी ह्रिषीपंचमी १६३३ मध्ये छोट्या मुर्तजाला मांडीवर घेऊन स्वराज्य स्थापनेचा पहिला प्रयत्न केला; म्हणून शहागड पेमगिरी या दुर्गाला हिंदवी स्वराज्य संकल्प भूमी असे सुद्धा म्हणतात याचा उल्लेख अनेक बखरींमध्ये व समकालीन कागदपत्रांमध्ये आढळतो. हे स्वराज्य १६३३ ते १६३६ पर्यंत चालू राहिले १६३६ मध्ये मुघल आणि आदिलशहा यांनी संयुक्तरित्या शहाजी महाराजांवरती हल्ला केला आणि माहुलीच्या किल्ल्यामध्ये शहाजी महाराजांना तह करावा लागला. या तहानुसार त्यांना कर्नाटकात जावे लागले. अशीही शहागड पेमगिरी म्हणजे हिंदवी स्वराज्याची संकल्प भूमी होय!

या गडावरती पुरातन पेमादेवीचे मंदिर आहे व सातवाहन कालीन पाण्याचे टाके आहेत. गावातील सागवानी लाकडामध्ये बनवलेले चार मजली मारुती मंदिर हे सुद्धा सागवानी लाकडातील शिल्पकलेचा उत्तम नमुना म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.त्या शेजारीच जगातील सर्वात उंच गदा स्थापित केलेली आहे. याच ठिकाणी शनिशिंगणापूर सारखेच शनी महाराजांच्या चौथरा आहे व या चौथ्यावरील स्वयंभू शिळा देखील आहे त्यामुळे पेमगिरी गावाला प्रति शनिशिंगणापूर असे सुद्धा म्हटले जाते.

चार मजली सागवानी मंदिर; शनि देवाचे दर्शन करण्यासाठी आणि गावातील बारव, महादेव मंदिर उजव्या सोंडेचा गणपती अशा ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी पर्यटक येतात. पावसाळ्याच्या उत्तरार्धात भरपूर धबधबे चालू होतात आणि मग चिंब पावसात भिजण्यासाठी पर्यटकांची पावले पेमगिरीकडे वळतात.

गावाच्या पूर्वेला स्वातंत्र्य सेनानी प्रल्हाद दीक्षित यांचे स्मारक आहे. येथे स्वातंत्र्यसदिन व प्रजासत्ताक दिन मोठया धामधूमीत साजरा होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →