शेरलॉक होम्स (इंग्लिश: Sherlock Holmes) हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंडमधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे.
१८८७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्ध झालेल्या होम्सवर डॉयल यांनी ४ कादंबऱ्या आणि ५६ लघुकथा लिहिल्या. “अ स्टडी इन स्कार्लेट” ही पहिली कादंबरी “बीटन्स ख्रिसमस ॲन्युअल” नावाच्या वार्षिकात १८८७ या वर्षी प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी “द साइन ऑफ फोर”, 'लिपिनकॉट्स मंथली मॅगेझीन' या मासिकेत १८९० साली प्रकाशित झाली. या नंतर इ.स.१८९१ ते १९२७ पर्यंत “द स्ट्रँड मॅगझीन” मध्ये प्रकाशित झालेल्या लघुकथांमधून होम्स या पात्राला वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. कथानकातील घटना १८८० ते १९१४ या कालावधीत घडतात.
शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेरकथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. काही मराठी कथांमधे, उदाहरणार्थ भा.रा. भागवतांची पुस्तके, शेरलॅाकला "शरलॅाक" असे संबोधलेले दिसते.
डॉयल यांनी या कथा, होम्सचे सहकारी, मित्र आणि चरित्रकार डॉक्टर जॉन एच. वॉटसन हे कथन करीत आहेत, अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. एकूण कथांपैकी केवळ चार वगळून बाकी सर्व कथांचे कथन डॉ. वॉटसन करतात. राहिलेल्या चार पैकी दोन कथांचे कथन स्वतः होम्स करतात आणि दोन कथा तृतीय-पुरुष दृष्टिकोनातून सांगितल्या गेल्या आहेत.
शेरलॉक होम्स
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.