शार्क

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

शार्क

शार्क (गुजराती:सूसवाट) एक मांसाहारी जलचर प्राणी आहे.शार्क मास्यांच्या ४४० जाती आजतागायत माहित आहेत.समुद्रातील सर्वांत धोकादायक प्राणी किंवा 'टायगर ऑफ दी सी' म्हणून शार्क मासे ओळखले जातात. त्यांच्या सु. ३५० जाती आहेत. त्यांपैकी ३० जाती मानवाच्या दृष्टीने धोकादायक आहेत. सर्व शार्क दिसण्यास सारखे दिसतात, पण त्यांच्या आकारांत व रंगांत विविधता आढळते. ते निळ्या, करड्या, पिवळ्या, तपकिरी, पांढऱ्या अशा विविध रंगांचे असतात. काहींच्या शरीरावर पट्टे, ठिपके किंवा नक्षी दिसते. शार्कचे यकृत मोठ्या आकाराचे असून त्यात तेल साठविलेले असते. त्याचा उपयोग त्यांना पोहण्यासाठी होतो. बहुतेक शार्क अनियततापी आहेत, मात्र व्हाइट शार्क व मॅको शार्क हे नियततापी आहेत. त्यांचे आयुष्य सु. २५ वर्षांचे असते, पण काही १०० वर्षेही जगतात.

शार्क माशांचे अस्तित्त्व पृथ्वीवर सु. ३५ कोटी वर्षांपासून आहे. त्यांची उत्पत्ती इतर माशांबरोबर सु. ३६५ ते ४० कोटी वर्षांपूर्वी डेव्होनियन कालखंडात झाली असावी. जगातील सर्वच सागरात ते आढळतात. उष्णकटिबंधीय व उपोष्ण कटिबंधातील सागरी विभागात ते मोठ्या प्रमाणावर आढळतात. भूमध्यवृत्तावर त्यांचे प्रमाण अधिक व ध्रुवप्रदेशाकडे ते कमी-कमी होत गेल्याचे आढळते. ग्रीनलंड शार्क आर्क्टिक महासागरात खोलवर राहतात, तर मुशी मासे किनाऱ्यालगत आढळतात. बहुतेक शार्क साधारणपणे ४५५५ मी. खोलीवर आढळतात.

भारताच्या सागरी परिसरात व्हेल शार्क, टायगर शार्क, व्हाइट शार्क, मुशी व हॅमर हेडेड शार्क आढळतात. भारतात ते कोठेवाड, मुंबई, केरळ व प. बंगाल लगतच्या सागरांत वर्षभर आढळतात. हे मासे जुलै ते मार्च या काळात पश्चिम किनाऱ्यावर आणि मे ते जानेवारी या काळात पूर्व किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतात. कॅरकॅऱ्हिनस गँगेटिकस हा गोड्या पाण्यातील शार्क गंगा नदीत आढळतो.[१] Archived 2021-05-15 at the वेबॅक मशीन.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →