वेदोक्त

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

संस्कृत ही देव भाषा असल्याचा वैदिक व द्रविड संस्कृतीतील समज आहे.

वेद हे हिंदू धर्माचे आधारस्तंभ आहेत. ऋषिमुनींच्या नावे वेदांतील ऋचा येतात. पण ते काही त्या ऋचांचे रचनाकार नसतात. त्यांना त्या ऋचा दिसलेल्या असतात. त्यामुळे ही दैवीवाणी असल्याचे समजले जाते. आणि म्हणून ती अनुसरण्याची मुभा फक्त द्विजांना असल्याचे मानण्यात येते.

ज्यांचा दुसरा जन्म झाला त्यांना द्विज म्हणले जाते. मौंजीबंधनानंतर (मुंज) दुसरा जन्म झाल्याचे समजतात. हा मुंज करण्याचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांना आहे असे मानतात. म्हणून या ती वर्णांना द्विज वर्ण म्हणतात.

मंत्रांचे प्रकार २ आहेत.

१)वेदोक्त मंत्र.

२)पुराणोक्त मंत्र.

लोकमान्य टिळक आणि शाहू छत्रपती यांच्या संबंधात कडवटपणा आला त्यासाठी कारणीभूत झाले ते वेदोक्त प्रकरण! वेदोक्त प्रकरणाचे विवेचन करताना या घटनांचे साक्षीदार खुद्द बाळाचार्य खुपेरकर तसेच ज्येष्ठ संशोधक य. दि. फडके यांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. या प्रकरणाची विस्तृत चर्चा ग. रं. भिडे यांनीही केली आहे. वेदोक्त प्रकरणाचा टिळकांशी संबंध कसा, बघूया.

वेदोक्त प्रकरणाबद्दल अभ्यासकांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. शाहू महाराजांच्या बहुतांश चरित्रकारांनी असेच लिहिले आहे की, महाराज कार्तिक स्नानासाठी नदीवर गेले, तेव्हा ब्राह्मणाने त्यांच्यावर वेदोक्त मंत्रपूर्वक संस्कार करण्यास नकार दिला. “क्षुद्राला मंत्र सांगताना अंघोळ कशाला करावी लागते,” असेही म्हणाला. हा भटजी वेदोक्त मंत्र नव्हे, तर पुराणोक्त मंत्र म्हणत आहे, हे तिथे उपस्थित असलेल्या राजारामशास्त्री भागवत यांनी महाराजांच्या लक्षात आणून दिले. बाळाचार्य खुपेरकर मात्र वेगळाच घटनाक्रम सांगतात. छत्रपतींच्या पदरात जी सोळा शास्त्री घराणी होती, यांच्यापैकी एका घराण्यात बाळाचार्य खुपेरकर यांचा जन्म झाला होता. वेदोक्ताच्या वेळी त्यांचे वय २२-२३ वर्षांचे असावे. ते लिहितात, “शाहू महाराजांचे कार्तिकस्नान या वादाच्या वेळी नव्या राजवाड्यावरच होत असे. स्नानासाठी ते पंचगंगा नदीवर गेले होते वगैरे सर्वच खोटे आहे. ज्या ब्राह्मणाने ‘क्षुद्राला मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला पाहिजे?’ हे सांगितले ते चूकच होते.” अगदी प्रकरणाच्या मुळापासूनच मतभेदांना सुरुवात होते.

बाळाचार्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या दिवशी महाराजांचे कार्तिक स्नान व्हायचे होते, त्या पहाटे राजवाड्यावरून भटजींच्या घरी त्यांना नेण्यासाठी गाडी गेली. भटजी घरात नव्हता. बायकोने उत्तर दिले, त्यावरून भटजी कोठे असेल याची कल्पना गाडीवानाला आली आणि त्याने भटजीला गाठले. रात्रभर त्यांची अंघोळ राहिली असेल म्हणून गाडीवान भटजीच्या घराकडे गाडी नेऊ लागला, तोच भटजीचा तोल सुटला आणि म्हणाला, “क्षुद्राला पुराणोक्त मंत्र सांगायला अंघोळ कशाला करायला लागते?” हुजऱ्याने महाराजांना ही गोष्ट येऊन सांगितली. महाराजांनी भटजीला चाबकाने फोडून काढले. त्याला शिक्षा केली. महाराजांच्या तेव्हा लक्षात आले की, आपल्या घरात काही विधी वेदोक्त, तर काही पुराणोक्त पद्धतीने सांगितले जातात.

महाराजांचे बरोबरच होते, असे सांगून बाळाचार्य खुपरेकर लिहितात, “ब्राह्मणांनी आपले चारित्र्य निर्मळ ठेवलेच पाहिजे, धर्मकृत्य करणाऱ्यांनी तर निष्कलंकच राहिले पाहिजे. राजोपाध्यांना हे कळल्यावर त्यांनी त्या भटजीची नेमणूक लगेचच रद्द केली. पुढे कोल्हापूरच्या इतर ब्राह्मणांनी ज्या भटजीने महाराजांच्या हुजऱ्याला उलट उत्तर दिले, त्याची निंदाच केली आहे.” खुपेरकर सांगतात, “महाराजांबरोबर भटजीने वाद घातला वगैरे लिहितात ते सर्व खोटे. महाराजांसमोर वाह्यातपणे बोलण्याची कुणाचीही ताकद नव्हती. दस्तुरखुद्द छत्रपतींसमोर वेडेवाकडे बोलण्याची एका सामान्य भटभिक्षुकाची हिंमत झाली असेल का? ज्याने त्याने विचार करावा!”

महाराजांच्या घराण्यात पूर्वीपासूनच काही विधी वेदोक्त, तर काही पुराणोक्त पद्धतीने होत असत. मध्यंतरीच्या काळात वेदोक्त विधी बंद पडले होते. झाल्या प्रकारानंतर १९0१ साली पुन्हा एकदा आपले सर्व विधी वेदोक्त पद्धतीने व्हावे, असे शाहू छत्रपतींना वाटले आणि मुख्य राजोपाध्यांना विधी सुरू करण्याचे त्यांनी सांगितले. राजोपाध्ये यांनी महाराजांना सविस्तर पत्र लिहिले. त्यात म्हणले, “शास्त्राप्रमाणे बंद पडलेले वेदोक्त विधी कशा प्रकारे सुरू करता येतील, याबद्दल विचारविनिमय करावा लागेल आणि त्यासाठी मी स्वखर्चाने निरनिराळ्या ठिकाणाचे शास्त्री बोलावतो.” यानंतर राजोपाध्ये मुंबईला गेले. कारण, त्यांना एलएलबीची परीक्षा द्यायची होती.

राजोपाध्यांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्याला कधीही विरोध केला नाही, याचे पुरावे आहेत. य. दि. फडके यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकांनी मात्र याबद्दल आपल्या ग्रंथात स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. य. दि. यांच्या म्हणण्याप्रमाणे, अप्पासाहेब राजोपाध्ये शाहू छत्रपतींच्या घरची धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास अनुकूल नव्हते. राजोपाध्येंनी महाराजांच्या खासगी कारभाऱ्याला लिहिलेल्या पत्रात असे स्पष्ट म्हणले आहे -

“१. आजपर्यंतची वहिवाट काहीही असो, येथून पुढे सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने केले जावे अशी सरकारची इच्छा असल्यास माझी हरकत नाही.

२. एखादी वहिवाट बंद झाल्याची पुन्हा सुरू शास्त्राचा नियम आणविण्याची पद्धत आहे. ती या बाबतीत सोडून देऊन एकदम वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा आरंभ केला गेला. यामुळे हे प्रकरण या थरावर आले आहे, हे माझे दुर्दैव आहे. मी जर शास्त्राचा निर्णय मागविला असता तर काही एक विघ्न किंवा अडचण न येता वेदोक्त कर्मास केव्हाच आरंभ करता आला असता.” आता राजोपाध्येंचे म्हणणे खरे मानायचे की फडकेंचे तर्क? तुम्हीच ठरवा.

महाराज स्वतः गायत्री मंत्र म्हणत, त्यांना ‘श्रावणी’ करण्याचा अधिकार होता, (‘श्रावणी’ म्हणजे नवे यज्ञोपावित धारण करणे) बाळाचार्य खुपरेकर लिहितात, “महाराज ‘श्रावणी’ करीत. मी त्यांच्या समोरच्या रांगेत पाच-सहा फुटांवर बसत असे. वेदोक्ताचा अधिकार असलेलेच ‘श्रावणी’ करतात. काही वेदोक्त विधी पूर्वीच्या छत्रपतींनी बंद केले होते. ते पुन्हा सुरू करण्याबद्दलचा हा वाद होता. महाराजांच्या क्षत्रियत्वाबद्दलचा नव्हता. त्यांच्या वेदोक्ताच्या अधिकाराबद्दलचा नव्हता.” चिरोलच्या पुस्तकातसुद्धा काही काहीसे विधी (at certain religious ceremonies) असाच उल्लेख आहे, सगळे नाही. मधल्या काळात ४0 वर्षे महाराजांच्या घराण्यात वेदोक्ताचा संस्कार लोप पावला होता. तो तेवढा प्रायश्चित्त घ्या आणि पुन्हा सुरू करा, असे राजोपाध्यांचे म्हणणे होते.

इतरांची मते घेण्याच्या आधीच राजोपाध्यांना मात्र त्यांच्या कामावरून काढून टाकण्यात आले! राजोपाध्येंनी वेदोक्त विधी करण्यास नकार दिला होता का? मध्यंतरीच्या काळात कुणीतरी महाराजांचे याबद्दल कान भरले असावेत! दरम्यानच्या काळात महाराज लंडनला गेले आणि भास्करराव जाधव यांनी महाराजांच्या अपरोक्ष कोल्हापुरातील ब्राह्मणांची वतने, त्यांच्या जमिनी जप्त केल्या, त्यांच्या दक्षिणा बंद केल्या, सुमारे एक हजार ब्राह्मणांची उत्पन्ने जप्त केली आणि यामुळे वाद आणखी वाढला व न्यायालयापर्यंत गेला. तोवर याबद्दल टिळकांनी जाहीरपणे या वादाबद्दल काहीही लिहिलेले नाही.

शाहू महाराजांप्रमाणे इतर सर्व मराठ्यांना वेदोक्ताचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी खासेराव जाधव आणि इतर सत्यशोधकांनी सुरू केलेली होती आणि हे टिळकांच्या कानावर आल्यानंतर टिळकांनी यावर लेखन सुरू केले. टिळक लिहितात, “कोल्हापूरच्या संस्थानचे अधिपती राजा या नात्याने आपणाकडे असलेल्या धर्माच्या बाबतीत तिऱ्हाईतपणाचा अधिकार विसरून जाऊन जेव्हा एका विविक्षित ज्ञातीचे पुरस्कर्ते बनतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या खुळास पाठबळ देऊन परधर्मी सार्वभौम राजाकडे आपल्या संस्थानातील प्रजेस धाव घेण्यास लावतात तेव्हा या संबंधाने दोन शब्द लिहिणे जरूर होते.”

एका लेखात तर टिळकांनी स्पष्टच लिहिले आहे, “मराठे लोकांस वेदोक्त कर्म करणे असल्यास त्यांनी ते खुशाल करावे. त्यांचा हात धरणारा या काळात कुणीही राहिला नाही. पण अमक्या ब्राह्मणाने तो आमच्या घरी केला पाहिजे असा आग्रह मात्र त्यास धरता येणार नाही. निरनिराळ्या ज्ञातीतील लोकांचा सलोखा कसा व्हावा हे आम्हांस पाहणे आहे व तसा दृष्टीनेच या विषयावरील लेख आम्ही लिहिले आहेत.”

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →