विंडोज २०००

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

विंडोज २००० ही मायक्रोसॉफ्टच्या विंडोज या व्यक्तिगत संगणक, सर्व्हर व लॅपटॉप या संगणकांवर वापरल्या जाणाऱ्या संचालन प्रणाल्यांच्या मालिकेतील एक संचालन प्रणाली आहे. विंडोज २००० ही डिसेंबर १५, १९९९ रोजी उत्पादनासाठी प्रकाशित तर रिटेलसाठी फेब्रुवारी १७, २००० रोजी प्रकाशित झाली. तो विंडोज एनटी ४.० या संचालन प्रणालीची अनुक्रमिक आहे. या प्रणालीच्या प्रकाशनानंतर मायक्रोसॉफ्टने विंडोजची विंडोज ९क्ष मालिका खंडित करून विंडोज एनटी मालिकेला मुख्य मालिका केले. या प्रणालीचे अनुक्रमिक विंडोज एक्सपी ऑक्टोबर २००१ रोजी प्रकाशित झाले. विंडोज सर्व्हर २००३ ही खास सर्व्हरसाठीची प्रणाली विंडोज २००० सर्व्हर आवृत्तीची अनुक्रमिक ठरली व ती एप्रिल २००३ मध्ये प्रकाशित झाली. विंडोज एमई ही संचालन प्रणाली विंडोज २००० च्या सात महिने नंतर व विंडोज एक्सपीच्या एक वर्ष आधी प्रकाशित झाली, पण ती विंडोज २०००ची अनुक्रमिक ठरली नाही व तसा मूळ उद्देशही नव्हता. विंडोज एमईची रचना घरगुती वापरासाठी होती तर विंडोज २०००ची रचना व्यावसायिक वापराकरिता होती.

विंडोज २००० च्या एकूण चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या. इथे त्या चढत्या क्रमाने दिलेल्या आहेत: प्रोफेशनल (व्यावसायिक), सर्व्हर, ॲडव्हान्स्ड सर्व्हर (सुधारित सर्व्हर) आणि डेटासेन्टर सर्व्हर (माहितीकेंद्र सर्व्हर). मायक्रोसॉफ्टने विंडोज २००० च्या सर्व्हरसाठीच्या विंडोज २००० ॲडव्हान्स्ड सर्व्हर लिमिटेड एडिशन आणि विंडोज २००० डेटासेन्टर सर्व्हर लिमिटेड एडिशन या दोन आवृत्त्या प्रकाशित केल्या. या आवृत्त्या ६४-बिट इंटेल इटॅनियम लघुप्रक्रियकांवर चालणाऱ्या होत्या. या आवृत्त्या मायक्रोसॉफ्टने २००१ मध्ये प्रकाशित केल्या. विंडोज २००० च्या आवृत्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी असल्या तरीही त्यांच्या गाभ्यातील मायक्रोसॉफ्ट मॅनेजमेंट कन्सोल आणि मानक प्रणाली प्रशासनासारख्या अनेक सुविधा सारख्याच होत्या.

अपंग व्यक्तींसाठी असलेल्या सुविधा विंडोज एनटी ४.० पेक्षा विंडोज २००० मध्ये अधिक प्रमाणात आहेत. विंडोज २००० मध्ये अनेक सहाय्यक तंत्रज्ञाने आहेत तसेच मायक्रोसॉफ्टने वेगवेगळ्या भाषांमधून ही प्रणाली वापरण्याची सुविधा दिली आहे.

विंडोज २००० च्या सर्व आवृत्त्या एनटीएफएस (नवीन तंत्रज्ञान संचिका प्रणाली) व एन्क्रिप्टिंग फाइल सिस्टिम (सांकेतिक संचिका प्रणाली) त्याचप्रमाणे मूलभूत व गतिमान डिस्क स्टोरेज या सर्व संचिका प्रणाल्यांना समर्थन देतात. विंडोज २००० च्या सर्व्हरसाठीच्या आवृत्त्यांमध्ये ॲक्टिव्ह डिरेक्टरी सेवा पुरवण्याची सुविधा (स्रोतांचा श्रेणीबद्ध साचा) आणि डिस्ट्रिब्युटेड फाइल सिस्टिम (वितरित संचिका प्रणाली) (संचिका इकडून तिकडे नेण्याची सुविधा असलेली संचिका प्रणाली) या अतिरिक्त सुविधा होत्या. विंडोज २०००ची स्थापना ही मानवचलित किंवा स्वयंचलित या दोन प्रकारे करता येते. स्वयंचलितरित्या विंडोज २०००ची स्थापना करताना त्यातील सॉफ्टवेर उत्तर संचिकांचा आधार स्थापनेत विचारलेली माहिती भरते.

मायक्रोसॉफ्टने विंडोज २०००ची जाहिरात त्यावेळची विंडोज मालिकेतील सर्वांत सुरक्षित प्रणाली अशी केली. तरीही ती त्यावेळी कोड रेड व निम्डा सारख्या अनेक संगणकीय विषाणूंचे लक्ष्य बनली व त्यांना बळी पडली. विंडोज २०००ला तिच्या प्रकाशनानंतर जुलै १३, २०१० रोजी असमर्थित होण्यापूर्वी सलग दहा वर्षे दर महिन्याला सुरक्षेतील त्रुटी भरून काढण्यासाठी अद्ययावते मिळत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →