लोकशाळा : लोकांनी लोकांकरिता चालविलेल्या प्रौढांच्या निवासी शाळा. जे प्रौढ रीतसर शिक्षणाचा अनुभव घेऊ शकत नाहीत, अशा स्त्री-पुरुषांना ह्या शाळांतून शिक्षण दिले जाते. मुलांच्या तुलनेत प्रौढांना ग्रहणशक्तीचा व अनुभवाचा मोठा वारसा लाभला असल्याने ते शीघ्र गतीने शिक्षण आत्मसात करतात. व्यक्तिमत्वाचा विकास साधणाऱ्यान व जीवन समृद्ध करणाऱ्यार लोकशाळा म्हणजे प्रौढांना वरदानच लाभले आहे.
नीकोलाय फ्रीड्रिक सेव्हेरीन ग्रुंटव्हीग (१७८३−१८७२) हा डॅनिश शिक्षणतज्ञ व धर्मशास्त्रवेत्ता लोकशाळेचा जनक मानला जातो. १८१४ मध्ये नॉर्वे आणि डेन्मार्क विभक्त झाल्यावर डेन्मार्कवर आर्थिक आपत्ती आली. पुढे १८३४ साली डेन्मार्कमध्ये रक्तहीन क्रांती होऊन लोकशाही शासन स्थापन झाले. तेथील जनतेला राजास सल्लामसलत देण्याचे अधिकार मिळाले. लोकांनी ही जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडावी, या दृष्टीने त्यांना योग्य शिक्षण देणे आवश्यक आहे. अशा शिक्षणासाठी प्रौढांकरिता वेगळ्या स्वतंत्र शाळा स्थापन कराव्यात, असे ग्रुंटव्हीगने प्रतिपादन केले. यातूनच लोकशाळांची कल्पना मूर्त स्वरूपात आली.
डेन्मार्कमधील पहिली लोकशाळा ७ नोव्हेंबर १९४४ रोजी रायडिंग येथे स्थापन झाली. १८ ते २५ ह्या वयोगटातील तरुणांना या शाळेत प्रवेश मिळत असे. या शाळा उन्हाळ्यात ३ महिने वा हिवाळ्यात ५−६ महिने भरत. रुक्ष पुस्तकी अभ्यासक्रमापेक्षा एकमेकांशी मनमोकळा संवाद, परस्परांच्या मतांची देवघेव तसेच शिक्षक−विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध अशा सर्वसमावेशक शिक्षणावर ह्या शाळांत अधिक भर असतो. हे शिक्षण मातृभाषेतून दिले जाते. त्यामुळे डेन लोकांना त्यांचा देश, सामाजिक संस्था, ऐतिहासिक परंपरा यासंबंधी माहिती मिळते. मातृभाषेतून स्पष्टपणे त्यांचे विचार मांडता येतात. डॅनिश वाङ्मयाशी त्यांचा संबंध येतो. म्हणूनच लोकशाळांतून बाहेर पडणारी व्यक्ती देशाच्या कारभारात भाग घेऊ शकते आणि कोणत्याही सर्वसामान्य पदवीस ती पात्र ठरते.
लोकशाळा सर्वसाधारणपणे कारखान्यांच्या परिसरात स्थापन केल्या जातात. त्यामुळे तरुणांना कारखान्यांच्या कामाची तसेच सामाजिक जीवनाची माहिती मिळते. लोकशाळांच्या अभ्यासक्रमात सहलींना विशेष स्थान असते. विद्यार्थ्यांना या अनुभवांतून जे पहावयास मिळते, त्याचा उपयोग ते आपल्या दैनंदिन जीवनात करतात. तसेच त्यांना नागरिकत्वाची आणि लोकांच्या विविध प्रश्नांची योग्य जाणीव होते. लोकशाळांच्या अभ्यासक्रमात पुस्तकांना आणि परीक्षेला फारसे स्थान नाही. पुस्तकांऐवजी ज्वलंत शब्दांतून शिक्षण द्यावे, असा ग्रुंटव्हीगचा आग्रह होता. पुस्तकी भाषा ही निर्जीव असते ती लोकांमध्ये चैतन्य निर्माण करण्यास असमर्थ असते, असे त्याचे मत होते. लोकशाळांतून राष्ट्राभिमान व नागरिकांतील प्रेमाचे नाते वाढावे, यांसाठी प्रयत्न केले जातात.
लोकशाळांच्या अभ्यासक्रमात इतिहासाच्या शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. मात्र त्यात सनावळ्यांना महत्त्व नसून मानवाने चालवलेल्या लढ्याविषयी माहिती असते. ऐतिहासिक घटना काव्याच्या माध्यमातून विशद केल्या जातात. लोकशाळांचा अभ्यासक्रम साचेबद्ध होणार नाही, याची काळजी घेतली जाते. शाळाप्रमुखांना मात्र अभ्यासक्रम-निवडीचे स्वातंत्र्य असते. आधुनिक शिक्षणाच्या संदर्भात लोकशाळा या तरुणांना अनौपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळा होत. संगीतालाही लोकशाळांमध्ये महत्त्व असते. काही लोकशाळांतून व्यायामावर भर असतो. सुसंस्कृतपणा व सुबुद्धपणा ह्यांची जी मिरासदारी इतरत्र मूठबर श्रीमंतांजवळ असते, ती डेन्मार्कमधील लोकशाळांनी आमजनतेपर्यंत पोहोचविली. लोकशाळांमुळे डेन्मार्कचा शेतकरी आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीप्रमाणे अज्ञानातून मुक्त झाला. लोकशाळांतून विशिष्ट राजकीय तत्त्वप्रणालीचा प्रसार केला जात नसला, तरी तेथे डोळसपणे राजकीय शिक्षण दिले जाते. त्यामुळे लोकशाळांतून शिकलेले तरुण स्थानिक स्वराज्य संस्थांत आणि विधिमंडळांत कार्यक्षम ठरतात.
डेन्मार्कमध्ये सु. सत्तर लोकशाळा असून त्या राष्ट्रीय जीवनाचा कणा मानल्या जातात. या शाळांतून शिक्षण घेतलेले सु. दोन लाख लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात (१९८६). शासन लोकशाळांना सर्व प्रकारचे उत्तेजन देते. बहुतेक लोकशाळा खाजगी मालकीच्या आढळतात. काही लोकशाळा कामगार संघटनांनी चालविलेल्या आहेत. लोकशाळांत शिक्षण घेणाऱ्यांना शुल्क द्यावे लागते. गेर्लेव्ह, फ्रेडरिक्सबर्ग, हिलरॉड, मॅग्लिअस आणि डुरमांड येथील लोकशाळा विशेष प्रसिद्ध आहेत.
लोकशाळा या प्रथम डेन्मार्कमध्ये स्थापन झाल्या आणि आता त्या बहुतेक सर्व उत्तर युरोपीय देशांमध्ये आढळतात. या शाळा निवासी स्वरूपाच्या आहेत. ज्या तरुणांनी औपचारिक शिक्षण पुरे केले आहे आणि ज्यांनी व्यावसायिक कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्यांच्या नैतिक आणि बौद्धिक विकासासाठी या शाळा चालविल्या जातात. हे एक प्रकारचे निरंतर शिक्षणच होय. या शाळांतून स्थानिक आणि राष्ठ्रीय चालीरीतींचेही शिक्षण मिळते.
काही ठिकाणी मात्र लोकशाळांची धुमधडाक्याने सुरुवात झाली असली, तरी त्यांच्य नियोजनाची पुरेशी काळजी न घेतल्यामुळे त्यांना सार्वजनिक अथवा शासकीय साहाय्य मिळाले नाही. कामगार स्त्री-पुरुषांना शाळांतील शुल्क परवडत नाही. ज्यांनी अगोदरच शिक्षण घेतले होते त्यांना लोकशाळांतील शिक्षण एकप्रकारे सक्तीचे जाणवले. विशिष्ट राजकीय मतप्रणालीची शिकवण देण्याचा लोकशाळांचा उद्देश कामगारांना आक्षेपार्ह वाटला असून कामगार संघटनांनी त्याबद्दल निषेधही नोंदविलेला आढळतो.
लोकशाळा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.