प्रख्यात भारतीय नर्तकी लेडी लीला सोखी ह्या मेनका (Madame Menaka) या नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांचा जन्म पूर्व बंगालमधील बारिसाल (सध्या बांगलादेशात) येथे एका उच्चकुलीन जमीनदार घराण्यात झाला. शालेय जीवनात व्हायोलिन वादनात त्यांनी उत्तम प्रगती केली.
इ.स. १९०९ मध्ये व्हायोलिन वादनाच्या पुढील अभ्यासासाठी त्या इंग्लंडला रवाना झाल्या. लंडनमधील ‘सेंट पॉल गर्ल्स स्कूल’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पुढे पॅरिसमध्ये कूचबिहारच्या राणीसमवेत राहत असताना खलील देउशी या इराणी नर्तकाबरोबर मेनका यांनी पौर्वात्य नृत्ये सादर केली. नंतर कथ्थक नृत्यशैलीकडे त्यांचे मन आकृष्ट झाले. भारतात परतल्यावर लेडी मेनका यांनी कथ्थकचे अध्ययन सुरू केले.
पंडित सीताराम मिश्र, महाराज बिहारीलाल मिश्र, गुरू रामदत्त मिश्र, अच्छन महाराज व लच्छू महाराज या गुरूंकडे त्यांनी कथ्थकची तालीम घेतली. तसेच कथ्थकमधील लखनौ घराण्यातील नृत्यशैलीत विशेष प्रावीण्य मिळविले. तेव्हाच त्यांनी गुरू करुणाकरन् मेनन यांच्याकडे कथकलीचे व गुरू नबकुमार सिन्हा यांच्याकडे मणिपुरीचे अध्ययन केले. त्यांनी आपल्या संगीताच्या अध्ययनाची पार्श्वभूमी आणि कथ्थक, कथकली व मणिपुरी या नृत्यशैलींचा व्यासंग यांची सुरेख सांगड घालून स्वतःचे असे एक आगळे नृत्यनाट्याचे तंत्र व शैली निर्माण केली. कथ्थक हे मूलतः एकपात्री नृत्य समजले जाते; त्यात नाट्याची भर घालून त्यांनी कथ्थकवर आधारित असे पहिले नृत्यनाट्य तयार केले. मुंबई येथे इ.स. १९२६ मध्ये त्यांनी पहिला सार्वजनिक नृत्यप्रयोग सादर केला. या कार्यक्रमाला सुविख्यात रशियन नर्तकी ॲना पाव्हलोव्हा हजर होत्या.
कृष्णलीला, देव विजय नृत्य व मेनकालास्यम् ही त्यांची आरंभीची नृत्यनाट्ये होत. ही नृत्यनाट्ये प्रामुख्याने कथ्थकवर आधारित होती आणि ती ४५ मिनिटांची होती. नंतर त्यांनी सतत दोन वर्षे परिश्रम घेऊन कालिदासाच्या मालविकाग्निमित्रम् या नाटकावर आधारित संपूर्ण अडीच तासांचे नृत्यनाट्य सादर केले. त्यात त्यांनी कथ्थक, कथकली व मणिपुरी या शैलींचा मिलाफ केला होता. नृत्यनाट्यातील कथावस्तू, वेशभूषा, संगीत इत्यादी विविध अंगांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यांत परिपूर्णता साधण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
मेनका यांनी इ.स. १९३८ मध्ये भारतीय नृत्यपरंपरांच्या सखोल अभ्यासासाठी खंडाळा येथे एका नृत्यालयाची स्थापन केली. कथ्थक, कथकली व मणिपुरी या परंपरांतील विद्वान गुरू व संगीतज्ञ यांना पाचारण करून त्यांनी ते एक आदर्श गुरुकुल बनविले होते. नृत्यशिक्षणाबरोबर इतर औपचारिक शिक्षणाचीही व्यवस्था तिथे करण्यात आली होती.
त्यांनी आपले पती डॉ. साहेबसिंग सोखी यांच्या प्रोत्साहनाने अभिजात भारतीय नृत्याच्या प्रसाराकरिता अविरत मेहनत घेतली. त्यांनी अनेक वेळा भारतभर नृत्यप्रसारासाठी दौरे केले. 'बंगाल म्यूझिक असोसिएशन'ने त्यांना सुवर्णपदक अर्पण करून त्यांच्या नृत्यसेवेचा गौरव केला. कराची, हैदराबाद, लाहोर, कोलंबो इत्यादी शहरांतर्फे त्यांना मानपत्रे देण्यात आली. त्यानंतर त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार), मलाया, इंडोनेशिया वगैरे देशांत दौरे केले. इ.स. १९३६ मध्ये त्यांनी युरोपमधील शहरांतून विपुल प्रमाणात नृत्यकार्यक्रम सादर केले व बर्लिन येथील 'आंतरराष्ट्रीय नृत्य ऑलिंपिक'मध्ये (International Dance Olympiad) तीन सुवर्ण पदके मिळवून आपल्या नृत्यजीवनातील यशाचा कळस गाठला. या ऑलिंपिकमध्ये जगातील १७ राष्ट्रांनी भाग घेतला होता. मेनका यांनी सर्वांत जास्त पदके पटकवण्याचा मान मिळवून भारताला मोठा गौरव प्राप्त करून दिला. युरोपच्या दौऱ्यानंतर भारतीय नृत्यात प्रथमच मेनका यांनी आकर्षक नेपथ्याचा व रंगमंचीय प्रकाशाचा सुयोग्य वापर सुरू केला.
उदय शंकर यांच्या बरोबरीनेच मेनका यांनी भारतीय नृत्याचा प्रसार भारतात व भारताबाहेर करण्यात मोठा हातभार लावला. नृत्यकलेचे शिक्षण घेण्यास घरंदाज मध्यमवर्गीय मुलींना त्या काळी समाजामध्ये बराच विरोध होता. याविरुद्ध जाऊन मेनका यांनी मध्यमवर्गातील घरंदाज स्त्रियांना नृत्याचे प्रांगण खुले करून दिले. त्यांच्या बहुमोल कार्याचे खरे मूल्यमापन म्हणजे त्यांनी गुरू कृष्णन कुट्टी, गुरू बिपिन सिन्हा यांसारखे नर्तक, राम गांगुली यांसारखे संगीतदिग्दर्शक व विष्णू शिरोडकरांसारखे तबलावादक महाराष्ट्राला मिळवून दिले. तसेच दमयंती जोशी, शेवंती, मालती पांडे, कमला कीर्तिकर, शिरीन वजिफदार यांसारख्या नामवंत नर्तकींची परंपराही तयार केली. मेनका यांच्या कथ्थक नृत्यप्रणालीचा वारसा भारतात त्यांच्या दमयंती जोशी यांसारख्या शिष्यांनी पुढे चालवला.
लीला सोखी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.