दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस भू-अलंकरण (रांगोळी) दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात दि. २२ एप्रिल २०१७ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे संस्कार भारतीचे अखिल भारतीय रंगावली विद्या प्रमुख श्री.रघुराज देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. याचदिवशी पुण्यासह संपूर्ण देशभरातील २८ राज्यांमध्ये हा दिवस भू-अलंकरण (रांगोळी) दिन म्हणून साजरा झाला.
दि. ७ एप्रिल २०१७ रोजी म्हैसूर येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कार भारतीच्या अखिल भारतीय बैठकीत पहिल्यांदा भू-अलंकरण (रांगोळी) दिनाची संकल्पना मांडण्यात आली. त्यानुसार २२ एप्रिल हा दिवस भू-अलंकरण (रांगोळी) दिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन केले गेले. याच बैठकीत २०१७ या वर्षीच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार व संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष श्री. वासुदेव कामत यांच्यासह सर्व प्रांतांतील महामंत्री उपस्थित होते.
भू-अलंकरण (रांगोळी) दिन साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की, याच दिवशी जागतिक वसुंधरा दिन (वर्ल्ड अर्थ डे) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या पृथ्वीविषयी आदर,सन्मान व आत्मीयता प्रकट करण्याचा हा दिवस साजरा करण्याचा मानस संस्कार भारती या संस्थेने २०१७ साली मांडला.भारतीय संस्कृतीत रांगोळी ही कला प्राचीन कला म्हणून ओळखली जाते. ही कला म्हणजे आपल्या पृथ्वीचे, धरणी मातेचे आभूषण,अलंकार म्हणून ओळखले जाते. ही कला जगभरात प्रामुख्याने भारतात जोपासली जाते. या कलेची संपूर्ण जगभरात ओळख निर्माण करण्यात संस्कार भारतीचा मोठा वाटा आहे. आजही भारतातील अनेक गावात, शहरात सकाळी सुर्योदय झाला की घरासमोरच्या अंगणात रांगोळी काढली जाते.
२२ एप्रिल जागतिक वसुंधरा दिन या दिवशी आपल्या वसुंधरेला रांगोळी सारख्या विलोभनीय अशा अलंकाराने नटवणे म्हणजेच खऱ्या अर्थाने रांगोळी (भू-अलंकार) या प्राचीन कलेचा सन्मान करण्यासारखेच आहे.
रांगोळी दिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.