मोहन रानडे

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मोहन रानडे (डिसेंबर २५, इ.स. १९२९:सांगली, महाराष्ट्र - जून २५, इ.स. २०१९) हे गोवा मुक्तिसंग्रामात सहभागी झालेले मराठी कार्यकर्ते होते.

रानड्यांचा जन्म इ.स. १९२९ साली महाराष्ट्रात सांगली येथे झाला. पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी छेडलेल्या मुक्तिसंग्रामातील आझाद गोमंतक दलाचे ते प्रमुख नेते होते. सुरुवातीला व्यक्तिगत पातळीवर व नंतर आझाद गोमंतक दल या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी गोव्याच्या मुक्तीसाठी प्रयत्न केले. शिक्षकी पेशा स्वीकारून ते गोव्यात प्रवेशले. त्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध सशस्त्र बंड उभारले. पुढे बेती येथील पोलीस चौकीवर केलेले हल्ल्यात ते जखमी झाले आणि इ.स. १९५५ मध्ये पोर्तुगीज पोलिसांच्या तावडीत सापडले. पोर्तुगालात त्यांना २६ वर्षांची सजा फर्मावली गेली. गोव्याच्या मुक्तीनंतर भारत सरकार त्यांची सोडवणूक करु शकेल असते, परंतु भारत सरकारने दुर्लक्ष केल्याने त्यांना अनेक वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. अखेर १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर जानेवारी, इ.स. १९६९मध्ये त्यांची सुटका झाली.

रानड्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातील अनुभवांवर सतीचे वाण (मराठी) व स्ट्रगल अनफिनिश्ड (इंग्लिश), ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा शासनाने गोवा पुरस्कार (इ.स. १९८६), तर भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार (इ.स. २००१) देऊन गौरवले.

मोहन रानडे यांचे वयाच्या ९० व्या वर्षी २५ जून २०१९ रोजी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात कर्करोगाने निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →