मोरोपंत

या विषयावर तज्ञ बना.

मोरेश्वर रामचंद्र पराडकर तथा मोरोपंत, मयूर पंडित (जन्म : पन्हाळगड इ.स. १७२९; - बारामती, चैत्री पौर्णिमा, १५ एप्रिल १७९४), हे मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी होते. ते मुक्तेश्वर, वामन पंडित, रघुनाथ पंडित आणि श्रीधर यांचे समकालीन पंडित कवी होते.

पराडकर कुटुंब हे कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंब मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे होय. मोरोपंतांचा जन्म पन्हाळगड येथे झाला. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नोकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरून बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्यावर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे. त्यांनी सुमारे ६० हजार आर्या, श्लोकबद्ध स्तोत्रे, आख्याने व महिलांसाठी ओवीबद्ध गीते लिहिली; तसेच १०८ रामायणे रचली. मोरोपंतांनी त्यांच्या चार गुरूंचा उल्लेख आपल्या 'गंगावकिली' या काव्यात केला आहे. ते म्हणतात, 'गुरू माझे श्रीराम, श्रीमत्केशव, गणेश, हरि, चवघे'. हरी म्हणजे पंतांचे मौजीबंधन करणारे त्यांचे सौंदळचे कुलोपाध्याय हरभट वरेकर. श्रीराम म्हणजे वडील रामजीपंत. गोळवलकर घराण्यातील केशव पाध्ये व गणेश पाध्ये हे दोघे बंधू अशा चार गुरूंचा उल्लेख मोरोपंतांनी केलेला आहे.

पुण्यातील पेशवेकालीन सावकार श्रीमंत बाबुजी नाईक यांच्याकडे पुराणिक म्हणून मोरोपंतांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीतील कऱ्हा नदीकाठचा एक वाडा बाबुजी नाईकांनी मोरोपंतांना भेट दिला होता. या वाड्यातील एका खोलीत बसून मोरोपंतांनी आपल्या काव्यरचना निर्मिल्या. या खोलीच्या भिंतींवर यमक आणि अनुप्रास असलेले अगणित शब्द मोरोपंतांनी लिहून ठेवले होते. ते शब्द योग्य तेथे वापरून मोरोपंतांनी आपली काव्ये सजवत असत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →