मीप खीस (१५ फेब्रुवारी, इ.स. १९०९ – ११ जानेवारी इ.स. २०१०), (लग्नापूर्वी हर्मिने सांतोशित्झ) ही एक डच नागरिक होती. तिने, तिचा नवरा, जान खीस व इतरांसोबत मिळून ॲन फ्रँक व तिच्या कुटुंबाला नाझी जर्मनीपासून लपवून ठेवले होते. ती जन्माने ऑस्ट्रियन होती, मात्र इ.स. १९२०मध्ये, वयाच्या आकराव्या वर्षी, तिला एका डच कुटुंबाने दत्तक घेतले होते. ती फक्त सहा महिने तिच्या दत्तक कुटुंबासोबत राहणार होती, मात्र तिच्या अस्वास्थ्यामुळे हा काळ एक वर्षापर्यंत वाढवला गेला. यादरम्यान ती मनाने तिच्या दत्तक कुटुंबाच्या खूप जवळ आली व तिने त्यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. पुढे आयुष्यभर ती नेदरलँड्स मध्येच होती.
इ.स. १९३३ मध्ये तिने ऑटो फ्रँक यांच्या ओपेक्टा या कंपनीत काम चालू केले. ज्यूधर्मीय ऑटो नुकतेच जर्मनीतील नाझी अत्याचारांपासून वाचण्यासाठी त्यांच्या कुटुंबासोबत जर्मनीतून नेदरलँड्सला स्थलांतरित झाले होते. मीप फ्रँक परिवाराची जवळची मैत्रिण बनली होती. त्यांनी ओपेक्टा कार्यालयाच्या गुप्त खोल्यांमध्ये जाण्याचे ठरवल्यावर तिने त्यांना मदत केली. दोन वर्षांच्या त्या काळात मीप फ्रँक कुटुंबासाठी मोठा आधार होती व बेप वॉस्कुइलसोबत घरातील किराणामाल आणून देत असे. ऑगस्ट, इ.स. १९४२मध्ये फ्रँक कुटुंबाला विश्वासघाताने पकडल्यानंतर तिने ॲनची दैनंदिनी आपल्याजवळ सुरक्षित ठेवली. ॲन परत आल्यावर तिला दैनंदिनी परत देण्याचा तिचा विचार होता. मात्र ऑटो फ्रँक आउश्वित्झ छळछावणीतून परत आल्यावर त्यांना कळाले की ॲन व मार्गो छळछावणीत मरण पावल्या आहेत. हे समजल्यावर तिने ॲनची दैनंदिनी ऑटोला दिली व त्यांनी ती प्रकाशित केली.
तिच्या स्मरणार्थ ९९९४९ मीपखीस या लघुग्रहाला तिचे नाव देण्यात आले आहे.
मीप खीस
या विषयातील रहस्ये उलगडा.