महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी

२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. राज्यात ३ मे २०२० पर्यंत १२,९७४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २,११५ जण पूर्ण बरे झालेले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी ४% लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्ण मुंबई महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर - मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठीच्या १० 'हॉटस्पॉट' पैकी एक बनला आहे. १४ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात २३% रुग्ण असून एकूण मृत्यूंपैकी ४६% मृत्यू राज्यात झाले आहेत.

या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. ११ मार्च २०२० पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. १३ मार्च रोजी, महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला. राज्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले. २२ मार्च पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या. २३ मार्चला जमावबंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली. देशातील विमानतळे बंद करण्याचा संबंधित अधिकार पंतप्रधानांना असल्याने सर्व विमानतळे त्वरित बंद करण्याची विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.

महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. नागरिकांची उपासमार होऊ नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय झाला. २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवाही बंद करण्यात आली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करूनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरू नये या साठी पोलीस यंत्रणा झगडत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात गर्क आहे. मूलभूत अधिकारांसोबत नागरिकांनी आपल्या मूलभूत कर्तव्यांबाबतही जागरूक असायला हवे असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वरळे यांनी व्यक्त केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →