भारतीय स्वातंत्र्य दिवस

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारतीय स्वातंत्र्य दिवस

भारतीय स्वातंत्र्य दिवस हा दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून भारतात साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी युनायटेड किंग्डमपासून देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे. याच दिवशी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ च्या तरतुद लागू होऊन भारतीय संविधान सभेला वैधानिक सार्वभौमत्व प्राप्त झाले होते.

भारताचे प्रजासत्ताक देशात रूपांतर होईपर्यंत राज्याचे प्रमुख म्हणून किंग जॉर्ज सहावे हे कायम होते. २६ जानेवारी १९५० रोजी (भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो) भारताने राज्यघटना स्वीकारली आणि देशाचा सार्वभौम कायदा असलेले भारतीय संविधान लागू करून हा देश प्रजासत्ताक बनला. मोठ्या प्रमाणावर अहिंसक आंदोलने आणि सविनय कायदेभंगासाठी प्रख्यात झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीनंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते.

स्वातंत्र्यानंतर धार्मिक आधारावर भारताची फाळणी झाली, ज्यामध्ये ब्रिटिश भारत हा भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला. फाळणीनंतर हिंसक दंगली झाल्या तसेच मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. धार्मिक हिंसाचारामुळे जवळपास १.५ कोटी लोकांनी स्थलांतर केले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. त्यानंतरच्या प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकावतात आणि राष्ट्राला संबोधित करतात. हा संपूर्ण कार्यक्रम भारताचा राष्ट्रीय प्रसारक असलेल्या दूरदर्शनद्वारे प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम शक्यतो उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनई संगीताने सुरू होतो.



संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →