भालचंद्र त्र्यंबक रणदिवे (डिसेंबर १९, इ.स. १९०४ - एप्रिल ६, इ.स. १९९०) हे मराठी, भारतीय साम्यवादी राजकारणी व कामगारनेते होते. जनसामान्यांत ते बीटीआर (बी.टी.रणदिवे) या लघुनामाने परिचित होते.
१९२८ साला पासून त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षासाठी काम करण्यास सुरुवात केली. ते मुंबईतल्या कापड गिरणी कामगारांच्या गिरणी कामगार युनियन आणि रेल्वे कामगारांच्या युनियनचे प्रमुख नेते होते.त्यांचा विवाह कामगार चळवळीतल्या कार्यकर्त्या विमल ह्यांच्याशी १९३९ साली झाला.
१९४३ साली ते साम्यवादी पक्षाच्या केंद्रीय समितीवर निवडून आले. १९४६ साली झालेल्या नौदलातील खलाशांच्या देशव्यापी संपात तसेच तेलंगणात १९४६ ते १९५१ चाललेल्या शेतकऱ्यांच्या उठावात त्यांची मोठी भूमिका होती. १९४८ साली कोलकाता येथे झालेल्या द्वितीय अधिवेशनात त्यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी (पूरण चंद जोशी यांच्या जागी) नियुक्ती झाली त्या पदावर ते १९५० पर्यंत होते. पण देशभरात साम्यवादी पक्षाने केलेले संप, व काही सशस्त्र उठाव त्यांच्या कारकिर्दीत घडले या कारणास्तव त्यांना पक्षाच्या सरचिटणीसपदावरून व केंद्रीय समितीच्या सभासदत्वावरून पायउतार व्हावे लागले. (पक्षाने त्यांना केंद्रीय समितीत १९५६ साली पुनःप्रवेश दिला.)
१९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धाच्या वेळेस सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले होते. त्यांनी १९६४ नंतर काही काळ त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)साठी सुद्धा काम केले.
त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे ते थोरले बंधू होते.
बी.टी. रणदिवे
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.