बार्थेलेमी बोगांडा (सुमारे १९१० – २९ मार्च, १९५९) हे मध्य आफ्रिकन राजकारणी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. फ्रेंच इक्वेटोरियल आफ्रिका या वसाहतीचा भाग असलेला हा प्रदेश जेव्हा उबांगी-शारी नावाने फ्रांसच्या प्रशासनाखाली होता, तेव्हा बोगांडा स्वतंत्र्यपूर्व काळात अत्यंत सक्रिय होते. हे मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाचे पहिले पंतप्रधान होते.
बोगांडा यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या पालकांच्या मृत्यूनंतर रोमन कॅथोलिक धर्मप्रचारकांनी त्यांना दत्तक घेतले आणि त्यांचे शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९३८ मध्ये त्यांची रोमन कॅथोलिक पुरोहित (पाद्री) म्हणून दीक्षा झाली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान, बोगांडा यांनी अनेक ठिकाणी मिशनरी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर बांगुईच्या बिशपने त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहित केले. इ.स. १९४६ मध्ये, ते फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये निवडून आलेले पहिले उबांगीयन होते. तेथे त्यांनी वर्णद्वेष आणि वसाहतवादी राजवटीच्या शोषणाविरोधात आवाज उठवला. त्यानंतर ते राजकीय संघटना स्थापन करण्यासाठी उबांगी-शारी येथे परतले, ज्याचा परिणाम १९४९ मध्ये मूव्हमेंट फॉर द सोशल इव्होल्यूशन ऑफ ब्लॅक आफ्रिका (मीसान) च्या स्थापनेत झाला. ही संघटना ग्रामीण लोक आणि शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली. संसदीय सचिव असलेल्या मिशेल जुर्दैन यांच्याशी संबंध निर्माण झाल्यानंतर आणि पुढे त्यांच्याशी लग्न केल्यावर बोगांडा यांना पुरोहितपदावरून मुक्त करण्यात आले. असे असले तरी, १९५० च्या दशकात त्यांनी या प्रदेशातील कृष्णवर्णीयांसाठी समान वागणूक आणि मूलभूत हक्कांचा पुरस्कार करणे सुरूच ठेवले. फ्रांसने आपल्या वसाहतींना प्रतिनिधित्वाचे अधिकार देण्यास सुरुवात केल्यावर, मीसानने स्थानिक निवडणुका जिंकल्या आणि उबांगी-शारीच्या सरकारमध्ये बोगांडा यांचा प्रभाव वाढला; तथापि एका अयशस्वी आर्थिक योजनेला पाठिंबा दिल्याने त्यांच्या प्रतिमेला काहीसा धक्का बसला.
इ.स. १९५८ मध्ये फ्रेंच पंतप्रधान चार्ल्स दे गॉल यांनी फ्रान्सच्या वसाहती मुख्य देशाशी (मेट्रोपोल) जोडण्यासाठी 'फ्रेंच कम्युनिटी' स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. कम्युनिटीचे सदस्यत्व मिळाल्याने भविष्यात स्वातंत्र्य मिळवण्यात अडथळा येणार नाही अशी खात्री पटल्यानंतर बोगांडा यांनी त्यात सामील होण्यास पाठिंबा दिला. फ्रेंच इक्वेटोरियल आफ्रिकेतील इतर प्रदेशांसह मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक म्हणून महासंघाचा भाग होण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यामुळे सदस्य राज्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल असा त्यांचा विश्वास होता. मध्य आफ्रिकेतील इतर देशांचा समावेश असलेल्या "युनायटेड स्टेट्स ऑफ लॅटिन आफ्रिका" या मोठ्या महासंघाचा पाया म्हणून हा प्रयोग यशस्वी होईल अशी त्यांना आशा होती. मात्र हे स्वप्न साकार होऊ शकले नाही आणि १ डिसेंबर रोजी बोगांडा यांनी केवळ उबांगी-शारी प्रदेशापुरतेच मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक स्थापन झाल्याची घोषणा केली. बोगांडा या स्वायत्त प्रदेशाचे पहिले पंतप्रधान (काउन्सिल ऑफ गव्हर्नमेंटचे अध्यक्ष) झाले आणि त्यांनी प्रशासकीय सुधारणा आखण्यास व पुढील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात केली.
२९ मार्च १९५९ रोजी बांगुईला जात असताना एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. तज्ज्ञांना विमानाच्या अवशेषांमध्ये स्फोटकांचे अंश आढळले होते, परंतु या घटनेचा संपूर्ण अहवाल कधीही प्रसिद्ध करण्यात आला नाही आणि त्यांच्या हत्येची शक्यता अद्याप अस्पष्टच आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाला इ.स. १९६० मध्ये फ्रान्सकडून अधिकृतरीत्या स्वातंत्र्य मिळाले. बोगांडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी देशात स्मरणोत्सव साजरा केला जातो आणि राष्ट्रीय स्मृतींमधील त्यांचे स्थान राजकीयदृष्ट्या आजही तितकेच प्रभावी आहे.
बार्थेलेमी बोगांडा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.