बांगलादेश किंवा पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश हे भारताच्या पूर्वेला असलेले बंगाली भाषिक मुस्लिम बहुल राष्ट्र आहे. १९४७ सालच्या अखंड भारताच्या फाळणीमध्ये पूर्व व पश्चिम अशा दोन भागात पाकिस्तानची निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन पूर्व पाकिस्तानाची भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात उर्दू वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. पाकिस्तानी लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
ढाका ही बांगलादेशची राजधानी व सर्वात मोठे शहर असून चट्टग्राम, सिलहट, राजशाही इत्यादी इतर मोठी शहरे आहेत. ब्रम्हपुत्रा, पद्मा व मेघना ह्या येथील प्रमुख नद्या आहेत. २०११ साली बांगलादेशची लोकसंख्या सुमारे १४.९७ कोटी होती. बांगलादेश हा जगातील आठव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा देश आहे.
बांगलादेश
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.