पिकू या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनोडोंटिडी मत्स्यकुलात करतात. अप्लोकाइलस लिनीअटस हे त्याचे शास्त्रीय नाव हे. तो 'झिर' या नावानेही ओळखत जातो. त्याची लांबी साधारणत: ८-१० सेंमी. असून जाडी हाताच्या करंगळीएवढी असते. हा मुख्यत: गोड्या पाण्यातील मासा आहे; परंतु थोड्या खाऱ्या (मचूळ) पाण्यातही तो राहू शकतो. त्याच्या डोक्यावर प्रकाशात चमकणारा एक ठिपका असतो. त्यामुळे काही मच्छीमार त्याला ‘वरडोळ्या’ तर काही, त्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर शिकारीची वाट पाहत निश्चल राहण्याच्या सवयीमुळे 'तरंग्या' असेही म्हणतात. ‘टॉपमिनो’ असे त्याचे इंग्रजी नाव आहे. हा मासा लहान असला, तरी त्याचे खरे महत्त्व डासांच्या अळ्या खाण्याच्या त्याच्या पटाईतपणात आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर फिरण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीमुळे व डासांच्या अळ्या खाण्याच्या त्याच्या विशिष्ट आवडीमुळे अळ्यांच्या नाशाच्या कामी तो फार उपयोगी पडतो. अगदी उथळ पाण्यात जाण्याची सवय व मचूळ आणि थोड्या उष्णही पाण्यात शिरण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तलावांच्या सान्निध्यातिल किंवा नदीकाठच्या गावांच्या सार्वजनिक आरोग्याच्या व डासांचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा मासा मानला जातो; त्याचा उपयोग योग्य रीतीने केला पाहिजे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पिकू (मासा)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.