पाताल लोक ही २०२०ची ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील एक हिंदी क्राइम- थ्रिलर वेब मालिका आहे. ही मालिका सुदीप शर्मा यांनी तयार केली, तसेच त्यांनी सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुंजित चोप्रा यांच्यासह कथा देखील लिहिली आहे. अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी याचे दिग्दर्शन केले. क्लीन स्लेट फिल्मिझ्म बॅनरखाली अनुष्का शर्माने या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेत जयदीप अहलावत, गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तरुण तेजपाल यांच्या २०१० च्या द स्टोरी ऑफ माय अॅसेसिन्स या कादंबरीवर आधारित, ही मालिका एका निराश झालेल्या पोलिसाविषयी आहे जो हत्येचा प्रयत्न चुकल्याच्या केसमध्ये उतरतो.
पाताल लोकचा प्रीमियर १५ मे २०२० रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर झाला. मालिकेचा नायक जयदीप अहलावत आणि इतर प्रमुख पात्र यांचा अभिनय, कथानक, लेखन आणि दिग्दर्शन यांचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. या मालिकेला समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही मालिका द इंडियन एक्सप्रेसने २०२० च्या सर्वोत्कृष्ट १० भारतीय वेब सिरीजच्या यादीमध्ये समाविष्ट केली. व्हरायटी मॅगझिनने पाताल लोकला २०२० च्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टीव्ही कार्यक्रमांंपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले.
पाताल लोकला पहिल्या फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये आठ नामांकने मिळाली आणि यापैकी पाच पुरस्कार जिंकले - सर्वोत्कृष्ट अभिनेता (जयदीप अहलावत), सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट मूळ कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय). मे २०२० मध्ये निर्मात्यांनी जाहीर केले की दुसरा भाग तयार केला जाणार आहे.
पाताल लोक (वेब मालिका)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.