परिसा भागवत

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

संत परिसा भागवत हे संत नामदेवांचे प्रथम शिष्य म्हणून परिसा भागवतांना वारकरी संप्रदायामध्ये मान दिला जातो. पंढरपुरात नामदेवांच्या जवळ राहणाच्या परिसा भागवातांनी श्रीरुक्मिणी देवीचे मोठे अनुष्ठान केल्यामुळे, आराधना केल्याने श्रीरुक्मिणीदेवी त्यांना प्रसन्न झाली होती. प्रसन्न होऊन देवीने कोणताही वर माग, असे सांगितले. “माझे चित्त तुझ्याभजनी निरंतर रत असावे व माझा संसार सुखाने चालावा.” रुक्मिणी देवीकडे परीसाने वर मागून घेतला.

अशी प्रचलित कथा नामदेव-परिसा यांच्या संवादातून आली आहे. यासाठी देवीने त्यांना परीस दिला, परिसा भागवतांनी परीस आपली पत्नी ‘कमलजा’ हिच्याकडे काळजीपूर्वक दिला. तेव्हापासून परिसा भागवतास अहंकार झाला. परंतु पुढे संत नामदेवांच्या संयमी शांत स्वभावामुळे, परिसांचा अहंकार गळून पडला, व ते नामदेवाचे भक्त बनले.

संत नामदेवांच्या सहवासात राहून भजन कीर्तन करीत राहिले. परिसा भागवत हे उच्च मानल्या गेलेल्या ब्राह्मण समाजातील, तर नामदेव हे शिंपी. एका ब्राह्मणाने एका शिंप्याकडून शिष्यत्व पत्करावे, याचे आश्वर्य तत्कालीन समाजाला वाटणे साहजिकच होते. समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था चौकटबद्ध स्वरूपात होती; कर्मठ वृत्ती ग्रंथप्रामाण्य मोठ्या स्वरूपात होते. अर्थात परिसाला निजबोध झाला होता. एका अलौकिक अनुभवाने त्यांनी संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारले. परिसा म्हणतात,

“तू शिंपी न माना। आम्ही उत्तम याती। वाया अहंमती पडलो देखा॥”

उच्च जातीमध्ये जन्मल्याने अहंकार वाढला, हे परिसाने कबूल केले. यातच परिसा भागवताची विनम्र वृत्ती लक्षात येते.

संत नामदेवांचे शिष्यत्व स्वीकारण्यास नामदेवांचे परमतसहिण्णुतेने भारावलेले व्यक्तिमत्त्व कारणीभूत ठरते. नामदेवांसारख्या प्रभावी व प्रतिभास व्यक्तिमत्त्वाच्या व संगतीत, सोबतीत असणाऱ्या परिसा भागवताने नामदेवांचे अनुयायित्व सहज स्वीकारले. ज्ञानेदव-नामदेवांच्या लोकविलक्षण स्वभावाचा व वागण्याचा प्रभाव पडला. त्यांच्या समकालीन संतांच्या मनावर समतेतून वैचारिक प्रगल्भतेचा खूप मोठा परिणाम झालेला दिसतो.

नामदेवकालीन अनेक संतांना तसे स्वतंत्र अस्तित्त्व दिसत नाही. त्यांच्या आचार विचारांवर, सामाजिक जीवन जगण्यावर नामदेवांचे सखोल संस्कार झालेले दिसतात, ज्ञानदेव-नामदेवांच्या सहवासात, सान्निध्यात त्यांचे जीवनादर्श स्वीकारण्यात, अनेक बहुजन समाजातील संत स्वतःचे अंतर्बाह्य जीवन घडविण्यात अतिशय आनंदाने संगत, सोबत करीत होते.

संत परिसा भागवतांचे पूर्वायुष्य अतिशय प्रखर अहंकारात गेले; पण नामदेवांच्या सहज संवादात आल्यानंतर मनाची पवित्रता, विचाराची नम्रता आचरणात आली. समतेचा सहजभाव, भक्तीच्या माध्यमातून जन्माला आला आणि वाळवंटी नामदेव कीर्तनासाठी हाती टाळ घेऊन रामकृष्णहरी म्हणण्यासाठी उभे राहिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →