नौकाक्रीडा नौकांतून केलेला जलविहार तसेच विविध प्रकारच्या नौकास्पर्धा यांचा अंतर्भाव या क्रीडाप्रकारात होतो. नौकाक्रीडांसाठी समुद्र, नद्या, लहानमोठे तलाव यांची सोय असावी लागते. बहुतेक देशांतून नौकांचे क्रीडाप्रकार लोकप्रिय आहेत.
प्रागैतिहासिक काळापासून मानवाला नौकेचा उपयोग ज्ञात होता. प्रारंभी लाकडाच्या ठोकळ्याचा गाभा कोरून नौका बनवीत व त्यास वल्ह्याने गती देत. पुढे नौकांना शिडे बांधून वाऱ्याचा उपयोग करून घेतला गेला. आधुनिक काळात वाफेच्या किंवा पेट्रोलच्या शक्तीवर चालणाऱ्या नौका प्रचारात आल्या. नौकाक्रीडांचे प्रकार प्राचीन ईजिप्शियन, ग्रीक आणि रोमन लोकांमध्येही प्रचलित होते, असे दिसते. दुसऱ्या चार्ल्स राजाने १६६० साली इंग्लंडमध्ये नौकेतून सहल करावयास प्रांरभ केल्याने लोकांचे लक्ष तिकडे आकर्षित झाले. त्यानंतर तेथे नौकांच्या शर्यती आणि तत्सम इतर रंजनात्मक प्रकार लोकप्रिय झाले. १७२० साली स्थापन झालेला ‘वॉटर क्लब ऑफ कॉर्क हार्बर’ हा सर्वांत जुना बोट क्लब होय. अमेरिकेतही अशा नौकांचा उल्लेख १७१७ सालापासून सापडतो. त्यानंतर न्यू यॉर्क येथे १८११ साली ‘निकरबोकर बोट क्लब’ आणि १८३५ मध्ये ‘बॉस्टन यॉट क्लब’ स्थापन झाले पण ते दोन वर्षांपेक्षा अधिक काळ चालले नाहीत. १८४४ साली ‘न्यूयॉक यॉट क्लब’ स्थापन झाला व तो स्थिरस्थावर झाला. अटलांटिक महासागरावरील पहिली शर्यत १८६६ साली झाली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या पूर्व किनाऱ्यापासून बर्म्यूडापर्यंत व पश्चिम किनाऱ्यापासून होनोलूलूपर्यंत अशा दोन शर्यतींची सुरुवात १९०६ मध्ये झाली.
नौकाक्रीडांचे व शर्यतींचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यांपैकी तीन प्रमुख होत : (१) हाताने वल्हविण्याच्या नौकाशर्यती, (२) शीडजहाजांच्या (यॉट) स्पर्धा व (३) यांत्रिक नौका (मोटरबोट) स्पर्धा. यांशिवाय अत्यंत वेगाने नौका चालविण्याची (स्पीडबोट) शर्यतही असते. या सर्व प्रकारांच्या नौकाशर्यतींत कोणती नौका अधिक वेगाने पाण्यावरून तरंगत जाऊन शर्यत जिंकते, ते पहावयाचे असते. हाताने वल्हविण्याचे कौशल्य, शिडे उभारण्याचे व ती योग्य त्या दिशेला फिरवून वाऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचे कौशल्य व सुकाणू हाताळण्याचे कौशल्यही पाहिले जाते. यांपैकी काही नौकाशर्यतींचा – वल्हविण्याच्या व शिडांच्या नौका – ऑलिंपिक सामान्यात समाविष्ट केल्यामुळे या शर्यतींना जागतिक महत्त्व व प्रतिष्ठा लाभली आहे.
नौकाक्रीडा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.