नीरा नदी

या विषयावर तज्ञ बना.

नीरा नदी

नीरा नदी ही महाराष्ट्रातील एक नदी आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शिरगाव ता. भोर गावाजवळ " नीरबावी " नावाचे एक पांडव कालीन पाण्याचे कुंड आहे.त्या कुंडाच्या गोमुखातून निरा नदीचा उगम होतो व हीच निरा पुढे पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातून वाहते. भोर तालुक्याच्या पश्चिम भागात निरा देवघर हे धरण बांधले आहे. कऱ्हा नदी, वेळवंडी नदी, गुंजवणी नदी, बाणगंगा(फलटण) नदी, पूर्णगंगा नदी (वीर), खेमवती नदी (लोणंद) ह्या नीरेच्या उपनद्या असून ती स्वतः भीमेची उपनदी आहे. निरानदीवर वीर धरण आहे. कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते.

तिच्या वेळवंडी या उपनदीवर भाटघर धरण आहे या धरणाच्या खालच्या बाजुला तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. या संगमावर संगमनेर नावाचे गाव आहे. या संगमापासुन ती सुरुवातीला पुणे व सातारा नंतर पुणे व सोलापूर जिल्ह्याची नैसर्गिक सरहद्दीचे काम करते. भोरपासून इंगवली गावापर्यंत नीरा तीव्र नागमोडी वळणे घेऊन मग पुन्हा पूर्ववाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून केंजळ या गावाजवळ शिवगंगा गुंजवणी नदी मिळते.

निरानदी पुणे जिल्ह्यातील भोर पुरंदर बारामती इंदापूर तालुक्याच्या दक्षिण तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यांच्या उत्तर सीमेवरून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे १६० किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयेस इंदापूर तालुक्यातील निरा नरसिंगपूर जवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे. पुणे – बंगलोर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर सारोळा ता. भोर व शिरवळ ता. खंडाळा या दरम्यान निरा नदीवर मोठा पूल बांधला आहे.



नीरा नदी मुख्यतः जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. तिच्या येळवंडी उपनदीवर भाटघर येथे बांधलेल्या लॉइड धरणाचे पाणी नीरेतच सोडले जाते. वीर ता. पुरंदर गावाजवळ नीरा नदीवर धरण बांधले असून डावा व उजवा असे दोन कालवे काढले आहेत. पैकी डावा कालवा पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तर उजवा कालवा सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस ,सांगोला तालुक्यातुन जातो. [→ वीर धरण]. नाटंबी येथे या नदीवर आणखी एक धरण बांधण्याची योजना आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →