हा लेख धुळे शहराविषयी आहे. धुळे जिल्हा हे स्वतंत्र पान आहे.
धुळे शहर हे धुळे जिल्ह्याचे मुख्यालय आहे. धुळे शहर हे महाराष्ट्रातील (खान्देश) एक महत्त्वाचे शहर मानले जाते. धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा अहिराणी/खान्देशी भाषेचे केंद्र आहे. २०२२ च्या लोकसंख्या अंदाजानुसार धुळे शहराची लोकसंख्या ६,७५,९०० आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो.
या शहरातून ३ महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात (ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ३ आणि राष्ट्रीय महामार्ग ६ चा समावेश होतो). धुळ्यातील गोंदूर येथे विमानतळ आहे. मराठीतील थोर इतिहासकार इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी संग्रहित केलेल्या कित्येक ऐतिहासिक वस्तू व कागदपत्रे येथील राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) जतन करून ठेवण्यात आली आहेत. मध्य रेल्वेच्या भुसावळ स्थानकाजवळ चाळीसगाव हे जंक्शन आहे, तेथून धुळ्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो.
जुने धुळे हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. शहरात ऐतिहासिक शाही जामा मशीद आहे, ज्याची निर्मिती मुघल सम्राट शाहजहान याने १६३० मध्ये एका स्वारीदरम्यान केली असल्याचे सांगितले जाते. शहरातील सुभाष नगर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. शहरात नकाणे तलाव, टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पाट बाजार, स्वामीनारायण मंदिर आणि पांझरा नदी ही प्रमुख आकर्षणे आहेत. धुळे शहरात आदिशक्ती एकविरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. देवपूर भागातील स्वामीनारायण मंदिर हे भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. तसेच नांदेडनंतरचा एक भव्य गुरुद्वारा आणि अंनजानशाह वली दर्गा हे धुळे शहरातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे.
धुळे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.