धाव (क्रिकेट)

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

धाव (क्रिकेट)

क्रिकेटच्या खेळात धाव तथा रन हे धावसंख्येचे एकक आहे. खेळाच्या अनेक प्रकारांमध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ विजयी होतो, किंवा किमान सामना अनिर्णित राहतो (पहा निकाल). डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार काही निकालांचा याला अपवाद असतो; ही पद्धत पावसामुळे बाधित झालेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांना धावा करण्यासाठी वेगवेगळ्या संधी मिळालेल्या असतात तेव्हा वापरली जाते.

जेव्हा दोन्ही फलंदाज (स्ट्रायकर आणि नॉन-स्ट्रायकर) खेळपट्टीच्या दोन्ही टोकांपासून धावण्यास सुरुवात करतात आणि सुरक्षितपणे पट्टीच्या दुसऱ्या टोकाला पोहोचतात (म्हणजेच धावबाद न होता परस्परांना पार करतात), तेव्हा एक धाव (ज्याला सिंगल असे म्हणतात) पूर्ण होते.

एकाच चेंडूवर किती धावा काढायच्या यावर कोणतेही बंधन नसते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला चेंडू परत मिळवण्यासाठी जितका वेळ लागतो, त्यानुसार फलंदाज एकापेक्षा जास्त वेळा धावून धावा पूर्ण करू शकतात. जर स्ट्रायकरने चेंडू मारल्यानंतर धाव पूर्ण केली, तर प्रत्येक पूर्ण झालेल्या धावेमुळे संघाच्या आणि त्या फलंदाजाच्या वैयक्तिक धावसंख्येत भर पडते.

फलंदाज चेंडू सीमा रेषेच्या पार मारून धाव न घेता देखील ४ किंवा ६ धावा करू शकतो:



जर चेंडूने सीमा पार होण्याआधी जमिनीवर टप्पा खाल्ला तर चार धावा (चौकार) मिळतात.

जर चेंडूने पहिला टप्पा सीमापार खाल्ला तर सहा धावा (षटकार) मिळतात.

एका डावातील संघाची एकूण धावसंख्या ही त्याच्या सर्व फलंदाजांच्या वैयक्तिक धावांची बेरीज आणि अवांतर धावांची बेरीज असते. प्रत्येक नो बॉल किंवा वाइड बॉल पद्दल संघाला एक अवांतर धाव मिळते, आणि जर फलंदाजाने न मारलेला चेंडू सीमा रेषेपर्यंत पोहोचला तर चार अवांतर धावा मिळतात.

दोन्ही फलंदाजांनी खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या पॉपिंग क्रीझच्या मागे जमिनीला स्वतःच्या शरीराचा किंवा बॅटचा कोणताही भाग टेकवल्यावरच धाव मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न करीत असलेला फलंदाज क्रीझमध्ये पोहोचण्यापूर्वी क्षेत्ररक्षकांनी चेंडूने यष्ट्या उडवल्या, तर फलंदाज धावबाद होऊ शकतो आणि ती धाव मोजली जात नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →