धनंजय कीर

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अनंत विठ्ठल कीर उर्फ धनंजय कीर (२३ एप्रिल १९१३ - १२ मे १९८४) हे चरित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म रत्‍नागिरी येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरी येथील स्कूल ऑफ इंडस्ट्रीमध्ये झाले. माध्यमिक शिक्षण काही काळ पटवर्धन हायस्कूलमध्ये होऊन ते रत्‍नागिरी हायस्कूलमधून मॅट्रिक झाले.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात २३ वर्षे नोकरी करून धनंजय कीर यांनी १९६२ च्या डिसेंबरमध्ये राजीनामा दिला. नोकरीत असताना त्यांनी 'फ्री हिंदुस्थान' ह्या इंग्लिश साप्ताहिकात भारतीय नेत्यांची जी व्यक्तिचित्रे लिहिली ती खूप गाजली. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झाली आहेत. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्धल त्यांना 'पद्मभूषण' हा 'किताब देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. शिवाय, नवनालन्दा महाविहार विद्यापीठाने १९७७ साली 'विध्यावारिधि' ही सन्मान्य पदवी देऊन, व कोल्हापूर विद्यापीठाने १९८० साली 'डॉक्टर ऑफ लेटर्स' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.

रत्‍नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर यांनी डॉ. धनंजय कीर यांचे चरित्र लिहिले आहे. या मराठी चरित्राची पहिली आवृत्ती २८ मे २०११ रोजी प्रकाशित झाली. या पहिल्या आवृत्तीत आणखी काही माहितीची भर घालून मसुरकर यांनी सुधारित पहिली आवृत्ती 'चरित्रकार धनंजय कीर' या शीर्षकाने २८ मे २०२३ रोजी प्रकाशित केली. तसेच, 'Biographer Dhananjay Keer' या शीर्षकासह मसुरकर यांनी लिहिलेले कीर यांचे इंग्रजी चरित्रही २८ मे २०२३ रोजी रत्‍नागिरीत झालेल्या एका विशेष समारंभात प्रकाशित झाले. (कार्यक्रमाच्या व्हिडिओची लिंक https://youtu.be/k6fZOnJo3s4) अवेश्री प्रकाशनाने ही पुस्तके छापील स्वरूपात प्रकाशित केली असून, सत्त्वश्री प्रकाशनाने (कोकण मीडिया) ती ई-बुक स्वरूपात प्रकाशित केली आहेत. कीर यांच्या जडणघडणीची आणि प्रवासाची उकल या चरित्रांतून होते. तत्पूर्वी, कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचा मराठी अनुवादही राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →