दत्तात्रेय विष्णु आपटे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दत्तात्रेय विष्णू आपटे (जन्म : हनगंडी-कर्नाटक, १३ मार्च, १८८१; - पुणे, २७ ऑक्टोबर १९२३) हे सक्रिय राजकारणी, पत्रकार, ज्योतिर्गणिती, चतुरस्र कार्यकर्ते, विविध भाषांचे जाणकार, लेखक, संपादक व इतिहाससंशोधक होते.

द.वि. आपटे यांचे शालेय शिक्षण हनगंडी, तेरदाळ व जमखिंडी येथे, उच्च शिक्षण कोल्हापुरातील राजाराम कॉलेजात व पुण्यातील फर्ग्युसम महाविद्यालयात झाले. त्यांना गणितात विशेष रुची होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी बाबासाहेब परांजपे यांच्या प्रेरणेने यवतमाळ येथील ’विद्यागृह’ नावाच्या राष्ट्रीय शाळेत अध्यापकाची नोकरी केली. त्या गावातून प्रसिद्ध होणाऱ्या ’हरिकिशोर’ या साप्ताहिकाचे ते १९०९पर्यंत संपादक होते. मुंबईच्या ’राष्ट्रमत’चेही ते काही काळ संपादक म्हणून राहिले. १९१५मध्ये ते पुण्यातील ’चित्रमयजगत्‌’चे संपादक झाले. त्यांचे ’लोकमान्यांचे स्मरण’ हा व इतर अनेक लेख चित्रमयजगतातून प्रसिद्ध झाले.

१९११साली गोव्यात मराठी शाळा काढण्यात पुढाकार घेतला. इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे गोव्यात इतिहास संशोधनासाठी आल्यानंतर द.वि आपटे यांना इतिहास संशोधनात रस वाटू लागला. त्यासाठी त्यांनी पोर्तुगीज, फारसी भाषांचा अभ्यास केला व मोडी लिपीचा सराव केला. १९१५साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन गोवा सोडले, व ते पुण्यात आले.

फाल्गुन वद्य तृतीया हीच कशी खरी शिवाजीची जन्मतिथी आहे, हे त्यांनी गणिताने सिद्ध केले. त्यानंतर अनेक वर्षांनी वा.सी. बेंद्रे यांच्या संशोधनानंतर हीच तिथी महाराष्ट्रात मान्य झाली.

लोकमान्य टिळकांचे ’टिळक पंचांग’ तयार करण्यात द.वि. आपटे यांचा सहभाग होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →