तमिळनाडू

थोडक्यात पण महत्त्वाचे.

तमिळनाडू

तमिळनाडू (लिहिण्याची पद्धत) तमिळ्नाडु (स्थानिक उच्चार) (तमिळ: தமிழ்நாடு/तमिळ्नाडु) अर्थ: "तमिळ लोकांचे राष्ट्र") हे भारतातील २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. चेन्नई (पूर्वीचे नाव:मद्रास) हे सर्वात मोठे शहर तसेच राज्याची राजधानी आहे. तमिळनाडू भारताच्या सर्वात दक्षिणटोकावरील द्वीपकल्पावर वसले आहे. पश्चिमेस केरळ, वायव्येला कर्नाटक, दक्षिणेस भारतीय महासागर व श्रीलंका, पूर्वेस बंगालचा उपसागर, तसेच केंद्रशासित प्रदेश (पुदुच्चेरी) आणि उत्तरेस आंध्र प्रदेश अशा त्याच्या चतुःसीमा आहेत. राज्याच्या वायव्येस निलगिरी पर्वतरांगा, अण्णामालै टेकड्या, पश्चिमेस पालक्काड, तर उत्तरेस पूर्वघाट आणि पूर्वदिशेला असलेला बंगालचा उपसागर दक्षिणेस पाल्कची समुद्रधुनी ओलांडून भारतीय महासागरात मिसळतो. दक्षिणेकडील टोकावर असणाऱ्या कन्याकुमारी ह्या प्रसिद्ध पर्यटनक्षेत्री तीन समुद्र एकमेकांत मिसळतानाचे दृश्य पहावयास मिळते.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने तमिळनाडूचा भारतात ११वा क्रमांक लागतो तर लोकसंख्येनुसार ७वा क्रमांक लागतो. तमिळनाडू हे भारतातील सर्वात मोठे शहरीकरण झालेले राज्य आहे, तसेच भारताच्या औद्योगिक विकास दरात (जी.डी.पी.) त्याचे पाचव्या क्रमांकाचे स्थान आहे. भारतातील सर्वाधिक उद्योगधंदे व त्यांची कार्यालये (१०.५६ टक्के) असणारे राज्य म्हणून तमिळनाडूचा प्रथम क्रमांक लागतो. वस्त्रोद्योग, साखर व सिमेंट हे येथील प्रमुख उद्योगधंदे आहेत. पण त्यामानाने देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोक तमिळनाडूत राहतात.

तामिळनाडूचे क्षेत्रफळ १,३०,०५८ चौ.कि.मी असून लोकसंख्या ७,२१,३८,९५८ एवढी आहे. तमिळ ही येथील प्रमुख भाषा आहे. तामिळनाडूची साक्षरता ८०.३३ टक्के आहे. चेन्नई ही तामिळनाडूची राजधानी असून सर्वात मोठे शहर आहे. तांदूळ, रागी, कापूस व ऊस ही येथील प्रमुख पिके आहेत. तामिळनाडूतील कावेरी नदी, पालर नदी व वैगई नदी या प्रमुख नद्या आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →