चंद्रयान १

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चंद्रयान १

चंद्रयान १ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रयान या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान आहे. चंद्रयान १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी११) या प्रक्षेपकाद्वारे चंद्रयानाचे प्रक्षेपण ऑक्टोबर २२, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

या दूरसंवेदनशील (रिमोट सेन्सिंग) अंतराळयानाचे वस्तुमान प्रक्षेपणाच्या वेळी ११३० किलोग्रॅम होते व ते चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यावर ६७५ किलोग्रॅम असेल. या अंतराळयानावर उच्च अचूकतेची (रिझोल्यूशनची) दृश्य व अवरक्त प्रकाश तसेच क्ष-किरणांसाठीची दूरसंवेदन उपकरणे आहेत. या यानाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून या काळात त्याच्याकडून चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करून त्याचा संपूर्ण रासायनिक नकाशा तयार करणे तसेच चंद्राच्या संरचनेचा त्रिमितीय नकाशा तयार करणे अपेक्षित आहे. चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशांना अधिक महत्त्व दिले आहे, कारण तिथे बर्फ असण्याची शक्यता आहे.

या मोहिमेचा एकूण खर्च अंदाजे ३८६ कोटी रुपये इतका आहे. या मोहिमेमध्ये इस्रोचे पाच भार (payload) व इतर अंतराळसंस्थांचे सहा भार आहेत. यामध्ये नासा, इसा व बल्गेरियाची अंतराळ संस्था यांचा समावेश आहे. या अंतराळ संस्थांची उपकरणे विना-आकार वाहून नेली जात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →