गोरा कुंभार

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

संत गोरा कुंभार (९ जुलै आषाढ शुद्ध १० १२६७ - २० एप्रिल, १३१७) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात. तज्ज्ञांच्या मते शा.श. ११८९ (इ.स. ९ जुलै १२६७ आषाढ शुद्ध १०) साली त्यांचा जन्म झाला असावा. संत गोरा कुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. गोरा कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते.

त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (२० एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली. गोरा कुंभार यांना गोरोबा काका म्हणत. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत.

तेर नगरीत गोराबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती. तेर येथील 'काळेश्वर’ या ग्रामदैवतांचे त्यांचे घराणे उपासक होते. दोघे नवराबायको कुंभारकाम व काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सदाचारी, सच्छिल वृत्तीमुळे तेर गावात माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळखत होते. माधवबुवांना आठ मुले झाली होती. त्यांना झालेली मुले जगत नव्हती. त्यांनी आपली सातही मुले काळेश्वराजवळील स्मशानातील गोरीत पुरली होती. माधवबुवा धार्मिक व सहिष्णु वृत्तीचे होते. काळेश्वरावर त्यांची निस्सीम श्रद्धा व भक्ती होती. सात मुले एका मागोमाग गेली परंतु आठवा मुलगा गोरोबा जिवंत राहिले.

संत गोरा कुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. पांडुरंगाचे निस्सीम भक्त असलेल्या गोरोबा काकांचे वीस अभंग आज आपल्याला पहायला मिळतात. संत मंडळींमध्ये संत गोरोबा काका हे ‘वडील’ होते, संत महात्म्यांना ते परम वंदनीय आणि आदरणीय होते. त्यामुळे सर्व संतांनी त्यांना “काका” ही उपाधी बहाल केली होती. गोरोबा काका हे विरागी पुरुष म्हणून ओळखले गेले, निर्गुण निराकार परब्रम्हाचे लौकिक रूप म्हणजे संत गोरा कुंभार. स्वतःचा परंपरागत कुंभार व्यवसाय करीत प्रपंच सांभाळून,संतत्व जपत त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला. आलेला दिवस परमेश्वराला स्मरून सार्थकी लावणारा खरा वारकरी असल्याची त्यांची धारणा होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →