गृहशोभन म्हणजेच (इंटिरिअर डेकोरेशन) वास्तूचा अंतर्भाग सुखकर, सुंदर व सुविधापूर्ण करण्याची कला. खाजगी घरे वा निवासस्थाने आणि सभागृहे, कार्यालये, रुग्णालये, उपाहारगृहे, क्रीडाभवने, चित्रपटगृहे यांसारख्या सार्वजनिक वास्तूंच्या सजावटीसाठी आधुनिक काळात गृहशोभनाचे स्वतंत्र तंत्रच निर्माण झाले आहे.
कुटुंबाचे राहणीमान, अभिरुची व विशेष गरजा इ. लक्षात घेऊन गृहशोभनाचे नियोजन करावे लागते. घरात इच्छित वातावरणनिर्मिती असावी म्हणूनही साधारणपणे फर्निचरचे रूप व मांडणी, प्रकाशयोजना, रंगसंगती यांचा विचार करावा लागतो. गृहशोभन ही एक संमिश्र कला असून तिच्याशी विविध विषय व तंत्रे निगडित आहेत. फर्निचरनिर्मितीची अनेक अंगोपांगे, रंगकाम, विद्युत्योजना इत्यादींचा संबंध गृहशोभनाशी असतो. गृहशोभनकाराला त्या त्या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना गृहशोभनाच्या आराखड्यानुसार मार्गदर्शन करावे लागते.
घरातील अंतर्भागाचे स्थूल मानाने दोन भाग पडतात. पहिल्या भागात वास्तूची मूळ अंगे म्हणजे भिंती, दरवाजे, खिडक्या, छत इ. व दुसऱ्या भागात वास्तूमधील साधने उदा., फर्निचर, गालिचे, पडदे, पंखे, दिवे, फुलदाणी, चित्रे, शिल्पे इ. कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. यांतील पहिला भाग वास्तुकलेचा आणि दुसरा भाग गृहशोभनाचा होय. गृहशोभनकाराला सर्व वस्तूंची मांडणी करताना त्यांची रेखासंगती, रंगसंगती, पोत इत्यादींचा मेळ साधावा लागतो.
गृहशोभन
या विषयातील रहस्ये उलगडा.