कोलाम नावाची आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, झरी-जामणी, घाटंजी, वणी, राळेगाव, मारेगाव, कळंब इत्यादी तालुक्यांमध्ये आणि यवतमाळ जिल्ह्याचे शेजारी असलेले नांदेड (माहूर, किनवट),
वर्धा आणि आदिलाबाद जिल्हा (तेलंगणा)च्या काही तालुक्यांमध्ये वस्ती करून राहते.
प्रामुख्याने डोंगराळ आणि जंगलाच्या भागात आणि मुख्य गावापासून काही अंतर राखून आपले वेगळे गाव म्हणजे पोड तयार करून राहणे यांना आवडते आणि मानवते देखील.
ही मंडळी बहुधा मुख्य गावात राहत नाहीत. स्वजातीय लोकांची एक वेगळी वस्ती करून राहण्याची नेमकी कारणे समजत नाहीत. हा समाज भटक्या नाही, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहणे यांनाही पसंत आहे. पण काही अपवादात्मक परिस्थितीत कोलाम लोक आपली वस्ती अन्यत्र हलवितात.
नवीन पोड वसविण्यापूर्वी कोलामातील निवडक मंडळी वस्तीसाठी योग्य जागा ठरवतात. अशा ठिकाणी मोराम देवाची पूजा सगळ्यात आधी करण्यात येते. मोराम देवाचा कौल मिळताच नवीन पोड उदयास येते. अशा नवीन पोडावर पहिल्या ३ वर्षात अन्य कोणत्याही देवाची पूजा होत नाही.
एकदा ३ वर्षे एका ठिकाणी काढल्यावर त्यांच्या इतर देवतांच्या आराधना आणि सणोत्सव ते साजरे करू लागतात. बहुतेक सणांचा संबंध हा निसर्गाशी जोडला असल्याचे दिसून येते. पण कोलामांचा गावबांधणी हा सण त्या सगळ्यात वेगळा आणि महत्त्वाचा आहे. दोन दिवस चालणारा हा उत्सव वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यातील कोणताही मंगळवार सोडून साजरा केला जातो. कोलामांच्या भाषेत या सणाला साती असे म्हणतात.
कोलामांची सगळ्यात महत्त्वाची देवता म्हणजे माहूरची श्री रेणुका देवी (चित्र). सगळ्या कोलाम पोडांवर रेणुका देवीची प्रतिकृती समजली जाणारी यल्लम्मा/पोचम्मा देवी या देवतेची स्थापना करण्यात येते. त्याशिवाय इतर अनेक देव आणि देवी यांची स्थापना देखील करण्यात येते.
कोलामांची स्वतंत्र न्यायपंचायत आहे. नाईक (नेकुन) हे त्यांचे त्या पोडापुरते प्रमुख. गाव प्रमुख म्हणून त्यांना फार मान असतो. सर्व सण-उत्सवात त्यांचा सहभाग असतो. गाव कारभार त्यांच्या नावाने चालतो. शिकारीची वाटणी, वारसांध्ये मालमत्तेची वाटणी करणे वगैरे कामे नेकुनची.
त्यांच्यानंतर महाजन (महाजन्याक) हे उप प्रमुख.
कारभारी हे गावाचे सचिव,
तर घट्या म्हणजे आमंत्रक,
असे चार मुख्य कार्यकर्ते कोलामांमध्ये आहेत.
या चौघांशिवाय भगत, भूमक, वासकारा आणि सोंगाड्या हे इतर महत्त्वाचे मानकरी आहेत.
कोलाम आदिवासी समाज
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.