कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे. गोवा राज्याची ही राजभाषा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग येथे ती प्रामुख्याने बोलली जाते.
पूर्वी कोकणी लिहिण्यासाठी कर्नाटकात कानडी, तर केरळीय कोकणी लोक मल्याळी लिपी वापरत असत. आतामात्र सर्वत्र देवनागरी लिपीतून कोंकणी लिहिली जाते. कोकणी मुसलमान अरबी लिपी वापरतात, गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात.
कोंकणी ही गोव्याची राजभाषा असून मराठीला गोव्यात समकक्ष दर्जा आहे. अनुस्वार हा कोंकणी भाषेचा श्वास आहे.
कोंकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोंकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ९८ लाखांहून अधिक आहे.
इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱ्या कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत.
गोव्यामध्ये सुनापरांत हे कोंकणी दैनिक दीर्घकाळ प्रकाशित होत होते. १ आगस्ट २०१७ साली ते बंद झाले. त्यानंतर आता भांगरभूंय हे देवनागरी कोंकणी दैनिक प्रकाशित होते. त्याचप्रमाणे ४ फेब्रुवारी २०१८ पासून गोंयकार हे कोंकणी भाषेतील पहिली आणि एकमेव न्यूजसाईट तसेच युट्युब चॅनेल सुरू करण्यात आले. गोव्याच्या ओपिनियन पोल काळात कोंकणी भाषेचा लढा 'राष्ट्रमत' या दैनिकाने लढवला होता. मराठी भाषेतून कोंकणीची बाजू मांडणारे हे दैनिक कालौघात बंद झाले. मात्र ४ फेब्रुवारी २०१८ पासून पत्रकार, लेखक किशोर अर्जुन यांनी राष्ट्रमत नावाने हे दैनिक ऑनलाईन प्रकाशित करू लागले. त्याचप्रमाणे राष्ट्रमतचे युट्युब चॅनलदेखील आहे. या व्यतिरिक्त गोव्यामध्ये रोमन कोंकणीमध्ये आमचो आवाज, वावरड्यांचो इष्ट ही साप्ताहिके प्रकाशित होतात. तर बिंब आणि गोंयकाराक जाग हे देवनागरी कोंकणीमध्ये साहित्यिक मासिके प्रकाशित होतात.
कोंकणी भाषा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.