कुळीथ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कुळीथ

कुळीथ (हुलगा, कुळथी गु. कुलीत हिं. कुलथी क. हुरुळी सं. कुलीथक इं. हॉर्स ग्रॅम, मद्रास ग्रॅम लॅ. डॉलिकॉस बायफ्‍लोरस, कुल-लेग्युमिनोजीउपकुल-पॅपिलिऑनेटी) ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती व एक प्रकारचे कडधान्य आहे. कुळीथ या कडधान्यात भरपूर लोह असते. पावट्याच्या वंशातील ही शिंबावंत (शेंगा येणारी) वेल उष्णकटिबंधात सामान्यपणे आढळते. अनेक शारीरिक लक्षणांत हिचे पावट्याच्या वेलीशी साम्य असले तरी काही फरक आहेत. हिची वेल वर्षायू (एक वर्ष जगणारी) असून फुले पतंगरूप, पिवळी आणि शिंबा लांब व वाकड्या असतात. त्यात पाच-सहा पिंगट, तांबूस किंवा काळ्या बिया असतात.

स्त्रियांस मासिक स्रावाच्या दोषांवर कुळिथाच्या बियांचा काढा देतात. उचकी, मूळव्याध, यकृताचे दोष यांवरही गुणकारी आहे लठ्ठपणा (मेदवृद्धी) कमी होण्यास व मुतखडा निचरून जाण्यास उपयुक्त असते. आजाऱ्याला अतिशय घाम येत असल्यास कुळथाचे पीठ सर्वांगास चोळतात. कुळीथ व मिरी यांचा काढा गंडमाळा व गालगुंडावर पिण्यास देतात. कुळथाचे दाणे भरडून, भिजवून अगर शिजवून दुभत्या आणि कष्टाळू जनावरांना पौष्टिक खाद्य (खुराक) म्हणून चारतात. दाण्यांची उसळ, कट अगर सार करतात. दाण्यांच्या पिठाचे पिठले वा गूळ घालून खाद्यपदार्थ बनवितात. पाला गुरांना चारतात. हे कडधान्याचे पीक मुख्यत्वेकरून भारताच्या दक्षिण भागात– आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांत– मोठ्या प्रमाणावर काढतात. मध्य प्रदेशात व महाराष्ट्रातही काही प्रमाणावर कुळीथ पेरतात. इतर कडधान्ये माणसांच्या आहारात प्रथिनांची भर घालण्याकरिता वापरतात, पण कुळीथ हे विशेषतः जनावरांच्या खुराकाकरिता वापरतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →