कागज के फूल हा १९५९ चा भारतीय हिंदी भाषेतील प्रणय-नाट्य चित्रपट आहे. गुरू दत्त यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले असून, वहीदा रेहमान सोबत मुख्य भूमिका देखील साकारली होती. हा सिनेमास्कोप पद्धत वापरणारा पहिला भारतीय चित्रपट आहे. तसेच दत्त यांनी अधिकृतपणे दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट आहे.
हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे अयशस्वी ठरला. त्या काळातील प्रेक्षकांना या चित्रपटाचा विषय फारसा भावला नाही. जरी सुरुवातीला हा चित्रपट नाकारला गेला, तरी १९८० च्या दशकात या चित्रपटाचे महत्त्व पुन्हा मानल्या गेले. तांत्रिक आणि भावनिक अशा दोन्ही दृष्टीने हा, काळाच्या पुढचा चित्रपट मानला जातो. आज हा चित्रपट जागतिक स्तरावर एक 'कल्ट क्लासिक' आणि उत्कृष्ट कलाकृती म्हणून ओळखला जातो.
या व्यावसायिक स्तरावरील अपयशामुळे गुरू दत्त यांना मोठा मानसिक धक्का बसला. यामुळे त्यांचा गुरू दत्त फिल्म्स हा स्टुडिओ आर्थिकदृष्ट्या कोसळण्याच्या मार्गावर आला होता. या चित्रपटाच्या पराभवामुळे गुरू दत्त इतके हताश झाले की, त्यानंतर त्यांनी कधीही अधिकृतपणे कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन केले नाही.
चित्रपटाचे संगीत एस.डी. बर्मन यांनी दिले होते आणि गीते कैफी आझमी आणि शैलेंद्र यांनी लिहिली होती. आज कागज के फूल हा अनेक चित्रपट शाळांमध्ये अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. हा भारतात बनवलेला सर्वोत्तम आत्म-प्रतिबिंबित करणारा चित्रपट मानला जातो.
कागज के फूल
या विषयावर तज्ञ बना.