कर्जत

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

कर्जत

निसर्गाने मुक्तहस्ते सृष्टिसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरील अतिशय रमणीय असा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनात लपलेली टुमदार गावे, ऐतिहासिक परंपरा असलेले किल्ले व दुर्ग, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जागृत देवस्थाने, सह्याद्रीच्या कुशीमधील थंड हवेची ठिकाणे, सांस्कृतिक व पौराणिक वारसा, लोककला, कोकणी जेवण हे सर्व प्रकार कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतात. कडाव येथील बाल दिगंबर मंदिर, वेणगांव येथील महालक्ष्मी मंदिर तसेच पळसदरी येथील स्वामी समर्थ यांचा मठ प्रसिद्ध आहे.

महात्मा गांधीजींच्या सन १९४२ च्या ‘छोडो भारत’ चळवळीत सक्रीय सहभागी असलेले आणि भूमिगत राहून कार्य केलेले विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. तालुक्यात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेला पेठ किल्ला अणि बुद्धकालीन कोंढाणे लेणी आहेत. कर्जत तालुक्यातील मुख्य व्यवसाय शेती असून भात, नाचणी, वरी, कडधान्ये, तेलबिया, ही प्रमुख पिके आहेत.

विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठ, शासकीय कार्यालये, वैद्यकीय सुविधा इत्यादींमुळे कर्जत तालुका प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व पर्यटन स्थळ माथेरान, मिनी ट्रेन, उंचावरून पडणारे दुधाळ धबधबे हे पर्यटकांच्या आकर्षणाची ठिकाणे आहेत.

कर्जत तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक शहर तसेच तालुका आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात उल्हास नदीच्या किनारी वसलेले आहे. हे शहर मुंबई-पुणे लोहमार्गावरील मुंबईच्या उपनगरीय मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक असून हे रेल्वेस्थानक खंडाळ्याचा घाट या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोरघाट घाटपायथ्याशी आहे. तसेच मुंबई आणि पुणे यांना जोडणारा कर्जत हा मध्यवर्ती तालुका आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →