करसनभाई खोडीदास पटेल (जन्म:१९४५, रुपपूर, पाटण, गुजरात) हे एक भारतीय अब्जाधीश व्यापारी, उद्योगपती आणि निरमा समूहाचे संस्थापक आहेत. पटेल हे सिमेंट, डिटर्जंट, साबण आणि सौंदर्यप्रसाधने यामधील प्रमुख व्यावसायिक आहेत. २०२१ पर्यंत फोर्ब्सने त्यांची एकूण संपत्ती US$4.9 अब्ज पेक्षा जास्त असल्याची माहिती दिली आहे. पटेल यांनी आघाडीचे फार्मसी कॉलेज (निरमा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी) आणि एक आघाडीचे अभियांत्रिकी महाविद्यालय/विद्यापीठ देखील स्थापन केले.
उत्तर गुजरातमधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या करसनभाई यांनी वयाच्या २१ व्या वर्षी रसायनशास्त्रात बीएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि लॅब टेक्निशियन म्हणून प्रथम लालभाई समूहाच्या अहमदाबादच्या न्यू कॉटन मिल्समध्ये आणि नंतर राज्य सरकारच्या भूविज्ञान आणि खाण विभागात काम केले. १९६९ मध्ये, करसनभाईंनी त्यांच्या घरामागील अंगणात उत्पादित आणि पॅकेज केलेले डिटर्जंट पावडर विकण्यास सुरुवात केली. हा कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त एकट्याने केलेला व्यवसाय होता. करसनभाई सायकलने आजूबाजूच्या परिसरात घरोघरी जाऊन स्वतः हाताने बनवलेल्या डिटर्जंटची पाकिटे विकत असत. याची किंमत ३₹ प्रति किलो, (अग्रगण्य डिटर्जंटच्या किंमतीच्या एक तृतीयांश) होती. करसनभाईंनी निरमा हे नाव त्यांच्या निरुपमा या दिवंगत मुलीच्या नावा वरून ठेवलेले होते. या व्यवसायात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्या नंतर तीन वर्षांनी, करसनभाईंनी आपली चालू नोकरी सोडली. करसनभाईंनी अहमदाबादच्या उपनगरात एका छोट्या वर्कशॉपमध्ये आपले दुकान थाटले. निरमा ब्रँडने गुजरात आणि महाराष्ट्रातील बाजारपेठ अत्यंत वेगाने काबीज केली.
डिटर्जंटची उच्च गुणवत्ता आणि कमी किंमत यामुळे या पावडरला मोठी मागणी निर्माण झाली. सर्वसामान्य घरगृहिनी जाहिरातींच्या जिंगल्समुळे, निरमाने डिटर्जंट मार्केटमध्ये क्रांती घडवून आणली, डिटर्जंट पावडरसाठी बाजारपेठेत पूर्णपणे नवीन विभाग तयार केला. त्यावेळी, डिटर्जंट आणि साबण निर्मितीवर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व होते, ज्यात हिंदुस्तान लीव्हरचे सर्फ सारखी उत्पादने होती, ज्याची किंमत सुमारे रु. १३ प्रति किलो इतकी होती. एका दशकात निरमा हे भारतात सर्वाधिक विकले जाणारे डिटर्जंट होते. हे उत्पादन श्रम-केंद्रित असल्याने, निरमा देखील एक अग्रगण्य नियोक्ता बनली, जिने २००४ साली १४,००० लोकांना रोजगार दिला. फॉस्फेट विरहित बनवलेले निरमा काहीसे पर्यावरणपूरक देखील होते.
अत्यल्प किमतीतील डिटर्जंटमध्ये आपला जम प्रस्थापित केल्यानंतर, निरमाने प्रीमियम विभागात प्रवेश केला, टॉयलेट सोप 'निरमा बाथ' आणि 'निरमा ब्युटी सोप' आणि प्रीमियम डिटर्जंट 'सुपर निरमा डिटर्जंट' लॉन्च केले. शॅम्पू आणि टूथपेस्टचे उपक्रम तितकेसे यशस्वी झाले नाहीत, परंतु खाद्य मीठ 'शुद्ध' चांगली बाजारपेठ काबीज करून आहे. लाइफबॉय आणि लक्स पाठोपाठचा निरमा ब्युटी सोप हा एक आघाडीचा साबण आहे. एकूणच निरमा कंपनीचा साबण केकमध्ये २०% आणि डिटर्जंटमध्ये सुमारे ३५% हिस्सा आहे. निरमाचे शेजारील देशांमध्येही यशस्वी व्यवसाय सुरू आहेत.
१९९५ मध्ये, करसनभाईंनी अहमदाबादमध्ये निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरू केली, जी गुजरातमधील एक प्रमुख अभियांत्रिकी महाविद्यालय बनली. निरमा एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशनच्या देखरेखीखाली २००३ मध्ये निरमा युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत संपूर्ण रचना एकत्रित करून व्यवस्थापन संस्थेने पाठपुरावा केला. निर्मलब्स एज्युकेशन प्रोजेक्ट, ज्याचा उद्देश उद्योजकांना प्रशिक्षण देणे आणि इनक्यूबेट करणे हा आहे, २००४ मध्ये सुरू करण्यात आला.
करसनभाईची दोन मुले, एक मुलगी आणि जावई आता निरमा संस्थेत आघाडीच्या पदांवर आहेत: राकेश के पटेल (एमबीए) प्रोक्योरमेंट आणि लॉजिस्टिक्स पाहतात, हिरेन के पटेल, केमिकल इंजिनीअर आणि एमबीए, मार्केटिंग आणि फायनान्स प्रमुख, तर कल्पेश पटेल मानव संसाधन आणि आरोग्य सेवा उद्योग (निर्लाइफ हेल्थकेअर) मध्ये आहेत.
करसनभाई पटेल
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!