ओमिक्रॉन (ओमायक्रॉन) कोरोना विषाणू हा सार्स-कोव्ह-२ (कोरोना) विषाणूचा एक प्रकार आहे, ज्यामुळे कोव्हीड -१९ होतो. डिसेंबर २०२१ पर्यंत, हा कोरोना विषाणूचा सर्वात नवीन प्रकार आहे. पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेने २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याची कलपना दिली. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूला एक चिंतेचा प्रकार म्हणून सांगितले आणि त्याला "ओमिक्रॉन" असे नाव दिले, ओमिक्रॉन हे ग्रीक वर्णमालेतील पंधरावे अक्षर आहे.
या विषाणू प्रकारामध्ये असामान्यपणे मोठ्या प्रमाणात उत्परिवर्तने आहेत, ज्यापैकी अनेक हे नवीन आहेत आणि त्यातील बरेच हे कोव्हीड - १९ लसींद्वारे लक्ष्यित केलेल्या स्पाइक प्रोटीनवर परिणाम करतात. या बदलामुळे त्याची संक्रमणक्षमता, रोगप्रतिकारक शक्ती आणि लस प्रतिरोधकतेबाबत चिंता निर्माण झाली आहे, जरी प्रारंभिक अहवाल असे दर्शवितात की या प्रकारामुळे पूर्वीच्या प्रकारापेक्षा कमी गंभीर रोग होतात. या प्रकाराला त्वरित "गंभीर प्रकार" म्हणून वर्गीकृत केले गेले आणि त्याचा आंतरराष्ट्रीय प्रसार कमी करण्यासाठी अनेक देशांनी प्रवास निर्बंध लागू केले.
गंभीर प्रकारच्या मागील प्रकारांच्या तुलनेत, ओमिक्रॉन हे जास्त सांसर्गिक (खूप लवकर पसरणारे) असल्याचे मानले जाते, आणि फुफ्फुसाच्या वायुमार्गामधे कोणत्याही मागील प्रकारांपेक्षा सुमारे ७० पट वेगाने पसरते, परंतु ते खोलवर प्रवेश करण्यास कमी सक्षम आहे आणि कदाचित या कारणामळे गंभीर आजाराच्या जोखमीमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकतेत लक्षणीय घट होईल. तरीही, दुहेरी लसीकरण आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती या दोन्हीपासून बचाव करण्याच्या क्षमतेसह, प्रसाराचा अत्यंत उच्च दर, म्हणजे कोणत्याही वेळी रुग्णालयात उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांची एकूण संख्या अजूनही चिंतेचा विषय आहे.
११-१६ नोव्हेंबर रोजी गोळा केलेल्या नमुन्यांच्या आधारे बोत्सवाना आणि दक्षिण आफ्रिकेतील प्रयोगशाळांमध्ये २२ नोव्हेंबर २०२१ रोजी हा नवीन प्रकार प्रथम आढळला. पहिला ज्ञात नमुना ८ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेत गोळा करण्यात आला. इतर खंडांमध्ये, पहिली ज्ञात प्रकरणे ११ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगमध्ये कतार मार्गे आलेली एक व्यक्ती होती आणि त्याच तारखेला इजिप्तहून तुर्कीमार्गे बेल्जियममध्ये आलेली दुसरी व्यक्ती होती. १६ डिसेंबर २०२१ पर्यंत, ८० पेक्षा जास्त देशांमध्ये या प्रकाराची पुष्टी झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डिसेंबरच्या मध्यापर्यंत, ओमिक्रॉन बहुतेक देशांमध्ये असण्याची शक्यता आहे, मग तेथे रुग्ण सापडु किंवा नाही.
ओमिक्रॉन कोरोना विषाणू
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.