उत्तम बंडू तुपे (जन्म : एनकूळ-खटाव (सातारा जिल्हा), १ जानेवारी १९४२; - पुणे, २६ एप्रिल २०२०) हे एक मराठी साहित्यिक होते.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकुळ हे जन्मगाव असलेल्या खेड्यात तुपे यांचे दुष्काळामुळे पोट भरणे शक्यच नव्हते. त्या दुष्काळी परिस्थितीत सापडून ते पुणेकर झाले. आपल्या बहिणीचा आधार त्यांनी घेतला. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. तेथे त्यांनी अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य मनःपूर्वक वाचले. तो प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यामधले लेखन बीज अंकुरले. आपल्या आत्याच्या आश्रयाने ते पुण्यात कसेबसे जगले. पडेल ती कामे पत्करली. हातावरची मोलमजुरी करून दिवस काढले. दुर्गंधीयुक्त झोपडपट्टीत हा प्रतिभावंतलेखक वाढला. त्याला योगायोगाने जिवाभावाची मानलेली मीनाताई बहीण भेटली. अनेकानेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागले. छ्बीसारखी सख्खी बहीण पण तिनेही पैशासाठी भावाला नाडले. शाळेत खोटारडे बसीन मास्तर यांनी जातीयवादी, माणुसकीला काळिमा फासणारी वागणूक दिली. पण शेवटी उत्तम बंडू तुपे या साऱ्यांवर मात करून थोर साहित्यिक झाले.
अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले आहे. कादंबरी, लघुकथा, नाटक आणि आत्मकथन या प्रकारांत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी ते लिहिले आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या वेदना-व्यथा त्यात चित्रित झाल्या आहेत. त्या चित्रणात वास्तवता आहे, सचोटीची अनुभूती आहे मातंग समाजाचे दुखणे मांडलेले आहे; जीवन संघर्षाचे वर्णन आले आहे. या आत्मचरित्रात सामाजिक स्थितीचे विदारक दर्शन घडत असल्याने आजवरच्या दलित आत्मकथनांत त्याचे स्थान अव्वल दर्जाचे म्हणावे लागेल.
उत्तम बंडू तुपे
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.