इस्तंबूल

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

इस्तंबूल

इस्तंबूल (तुर्की: İstanbul) हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर आहे. हे शहर तुर्कस्तानाचे आर्थिक तसेच सांस्कृतिक केंद्र आहे. मार्माराचा समुद्र व काळा समुद्र ह्यांना जोडणाऱ्या बॉस्फरसाच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही तीरांवर वसलेले हे शहर आशिया तसेच युरोप या दोन्ही खंडात आहे. जगातील मोठ्या शहरांपैकी हे एकमेव शहरे असे दोन खंडांत आहे.

या शहराला प्राचीन काळात बायझेंटियम तसेच कॉन्स्टॅंटिनोपल या नावांनीही ओळखण्यात येत असे. इ.स. ३३० पासून इ.स. १९२२ पर्यंत सुमारे १,६०० वर्षांच्या कालखंडात हे शहर कोणत्या न कोणत्या साम्राज्याची राजधानी होते. इ.स. ३३० - इ.स. ३९५ दरम्यान इस्तंबूल रोमन साम्राज्याची, इ.स. ३९५ - इ.स. १२०४ व इ.स. १२६१ - इ.स. १४५३ दरम्यान बायझेंटाईन साम्राज्याची, इ.स. १२०४ - इ.स. १२६१ दरम्यान लॅटिन साम्राज्याची तर इ.स. १४५३ - इ.स. १९५३ दरम्यान ओस्मानी साम्राज्याची राजधानी होते.

सध्या इस्तंबूल जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. २०१२ साली येथे सुमारे १.१६ कोटी विदेशी पर्यटकांनी भेट दिली. २०१० मध्ये इस्तंबूल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते. येथील ऐतिहासिक वास्तूंसाठी १९८५ साली इस्तंबूलचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला.

इस्तंबूल अतातुर्क विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ असून तुर्की एरलाइन्स ह्या तुर्कस्तानच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ इस्तंबूलमध्ये आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →