इक्वेटोरीयल गिनीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Guinea Ecuatorial, फ्रेंच: République de Guinée équatoriale, पोर्तुगीज: República da Guiné Equatorial; भाषांतर: विषुववृत्तीय गिनी) हा मध्य आफ्रिकेतील गिनीच्या आखाताच्या किनाऱ्यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे. ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.
इ.स. १७७८ ते इ.स. १९६८ दरम्यान स्पॅनिश गिनी नावाची स्पेनची वसाहत असलेल्या ह्या देशाला १२ ऑक्टोबर १९६८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. स्पॅनिश ही राष्ट्रभाषा असलेला इक्वेटोरीयल गिनी हा आफ्रिकेमधील एकमेव देश आहे. १९९० च्या दशकापासून इक्वेटोरीयल गिनी हा सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिका प्रदेशातील खनिज तेलाचा एक मोठा उत्पादक आहे. तेलाच्या निर्यातीमुळे हा देश सुबत्त बनला असून येथील वार्षिक सकल उत्पन्न जगात ६९व्या क्रमांकावर असून वार्षिक दरडोई उत्पन्न आफ्रिकेमध्ये सर्वाधिक आहे. तरीही येथे संपत्तीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर विषमता असून फार थोड्या नागरिकांना ह्या अर्थव्यवस्थेमुळे फायदा झाला आहे. इक्वेटोरीयल गिनीमधील बहुसंख्य जनता दारिद्र्यामध्ये जीवन कंठत आहे. १९७९ पासून राष्ट्राध्यक्षपदावर असलेला तियोदोरो ओबियांग एन्गेमा एम्बासोगो हा आफ्रिकेमधील सर्वात वाईट हुकुमशहा समजला जातो. त्याच्या राजवटीखाली इक्वेटोरीयल गिनीमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन जगात सर्वात चिंताजनक बनले आहे.
इक्वेटोरीयल गिनी
थोडक्यात पण महत्त्वाचे.