आयुष चिकित्सा प्रणाली अंतर्गत भारतीय चिकित्सा पद्धतींचा समावेश होतो. प्रामुख्याने आयुर्वेद, योग आणि नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी या शास्त्रांमधील अभ्यासक्रम आणि संशोधन कार्याचा विकास हे या संघटनेचे मूळ उद्दिष्ट आहे.
आरोग्य सेवा क्षेत्राच्या विकासासाठी भारत सरकारने स्थापलेल्या अनेक समित्यांनी भारतातील औषधांच्या पारंपरिक प्रणाली सुधारण्यावर भर दिला. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत (१९६१—१९६६) आयुर्वेदात डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आणि १९७० मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची स्थापना केली गेली, त्यानंतर १९७३ मध्ये सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी या संस्थेची स्थापन झाली. सहाव्या (१९८०—१९८५) आणि सातव्या (१९८५—१९९०) पंचवार्षिक योजनांमध्ये औषधे विकसित करणे आणि ग्रामीण कौटुंबिक आरोग्यासाठी चिकित्सकांचा उपयोग करण्यासाठी तरतुदी केल्या गेल्या. आठव्या पंचवार्षिक योजनेत (१९९२—१९९७) आयुषला मुख्य प्रवाहात आणण्याकडे लक्ष देण्यात आले आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत मार्च १९९५ मध्ये भारतीय औषधी व होमिओपॅथी विभाग सुरू करण्यात आला. नोव्हेंबर २००३ मध्ये विभागाचे नाव ‘आयुष’ असे करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात आयुष चिकित्सकांना एकत्रित करण्यासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आले. स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना ९ नोव्हेंबर २०१४ रोजी झाली. श्री. श्रीपाद नाईक हे आयुष मंत्रालयाचे पहिले मंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत.
“निरामय भारत प्रस्थापित करण्यासाठी अग्रक्रमाने स्वीकारार्ह जीवनशैली व उपचार पद्धतींची प्रतिष्ठापना करणे” हे आयुष मंत्रालयाचे दृष्टी विधान आहे.
आयुष (चिकित्सा प्रणाली)
थोडक्यात पण महत्त्वाचे.