आभासी वर्ग ही संगणक आणि नेटवर्क प्रणालीवर आधारित विद्यार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक वा अध्यापक यांच्यात संवाद साधण्यासाठी वास्तवभासी वर्गखोलीसारखे वातावरण निर्माण करणारी एक शिक्षण प्रक्रिया होय. या वर्गात ई-लर्निंग तंत्राच्या साहाय्याने विद्यार्थ्यांसाठी अध्यापन केले जाते. ही संकल्पना प्रामुख्याने दूरस्थ शिक्षणातील अध्ययनार्थ्यांच्या अध्ययनासाठी, त्यातील ई-लर्निंगच्या विशिष्ट मार्ग वापरासाठी उपयोगात आणली जाते. ‘आभासी वर्ग म्हणजे उपग्रहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण घडवून आणण्यासाठी राबविलेली एक व्यवस्था होय’ असा या संकल्पनेचा अर्थ आहे. म्हणजेच ‘वर्ग खोली व व्याख्यानांऐवजी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी वेबआधारित वा ऑनलाईन वर्गवातावरण तयार करण्याच्या पद्धतीला आभासी वर्ग असे म्हणतात’.
निरंतर शिक्षण व दूरस्थ शिक्षण यांमध्ये उदिष्ट्यपूर्तीसाठी व विद्यार्थ्यांच्या अध्ययनाच्या समस्या दूर व्हाव्यात यांसाठी आय.सी.टी.च्या साधनांच्या मदतीने ‘आभासी वर्ग’ ही नवी संकल्पना उदयास आली. पारंपरिक अध्ययन-अध्यापनामध्ये शिक्षक-विद्यार्थी प्रत्यक्ष समोर असतात. त्यातून आंतरक्रिया घडतात; मात्र आभासी वर्गामध्ये असे होत नाही. आभासी वर्गात अनेक विद्यार्थी जगातील कोणत्याही ठिकाणी संगणक, लॅपटॉप, मोबाईल, एल.सी.डी. इत्यादींसमोर विविध ठिकाणांरून ऑनलाईन प्रणालीचा आधार घेत दुसऱ्या बाजूला तज्ज्ञ अध्यापक किंवा स्रोत यांच्याशी संवाद साधत असतात. आपल्या समस्यांचे निवारण करत असतात. तेंव्हा अध्यापक-विद्यार्थी हे माईक, फोन्स, फॅक्स, इंन्स्टंट मॅसेजिंग इत्यादींद्वारे आंतरक्रिया साधत असतात.
आभासी वर्गासाठी अभ्यासकेंद्रावर किंवा शाळेमध्ये स्वतंत्र वर्गाची स्टुडिओ म्हणूनही उभारणी केली जाते. याठिकाणी संगणकीय सुविधा (ई-मेल, इंटरनेट, वाय-फाय) माईक, फोन्स, हेडफोन्स, टॅबलेट, लॅपटॉप, एल.सी.डी., ओ.एच.पी. व्हिडीओ, ऑडीओ यांसाठी कॅमेरा, रेकॉर्डर, इलेक्ट्रॉनिक साधने, 3D चष्मे, पेनड्राईव्ह, कॅसेट्स, विविध सॉफ्टवेअर्स, अप्लीकेशन्स, वातानुकूलित उपकरणे, अनुकूल वातावरण, बैठक व्यवस्था, स्वच्छ परिसर, सुमधुर अखंडित श्राव्य संगीत, वीजपुरवठा, उपग्रह फ्रीक्वेन्सी इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या असतात.
आभासी वर्गामध्ये अध्यापक अध्यापन करीत असताना, अध्ययन अनुभव देताना, संवाद साधताना त्यांचे बोलणे, लिहिणे, हावभाव इत्यादी व्हीडीओ कॅमेऱ्याद्वारे ध्वनी–चित्रमुद्रित केले जाते. हेच चित्रण त्याच वेळी लाईव्ह सर्वदूर पसरलेल्या आभासी केंद्रांवर उपग्रह फ्रिक्वेन्सी व नेट कनेक्टीव्हिटी यांद्वारे पाठविले जाते. हे ध्वनीचित्रण विद्यार्थी त्याच वेळी संगणक, एल.सी.डी., मोबाईल, लॅपटॉप किंवा टॅबलेट इत्यादी तंत्रांच्या माध्यमातून पाहत व ऐकत अध्ययन करीत असतात, परस्परांशी संवाद वा आंतरक्रिया करीत असतात. याद्वारे अध्यापक व अध्ययनार्थी यांमध्ये ज्ञानाचे, विचारांचे आदान-प्रदान होत असते.
आभासी वर्गातील अध्ययानार्थीना काही अध्ययन अनुभव प्रत्यक्ष देता येत नाही. उदा., भूकंप, ज्वालामुखी इत्यादी; मात्र भूकंप, ज्वालामुखी कसे निर्माण होतात यांचे चलचित्र दाखवून भूकंप, ज्वालामुखी या संकल्पना समजावून सांगता येतात. नियमित वर्गाचा आभास व विशिष्ट घटकाचा अभ्यास हा उपग्रह व माहिती तंत्रज्ञान या साधनांच्या मदतीने पूर्ण केला जातो. थोडक्यात, नियमित वर्गाचा आभास निर्माण केला जातो, म्हणून या वर्गास आभासी वर्ग असे म्हणले जाते.
आभासी वर्ग
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.