आनंद कुंभार

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

आनंद नागप्पा कुंभार (२७ मे, १९४१ - २८ नोव्हेंबर, २०१९) हे एक मराठी शिलालेख संशोधक, इतिहास अभ्यासक आणि शिलालेख वाचक होते. त्यांनी भीमा नदी व सीना नदी संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन संगमेश्वर मंदिरात असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना मानला गेलेला शिलालेख शोधून काढला.

कुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिकेची शाळा व नाईट हायस्कूल अशा तीन शाळांत झाले. १९६० ते १९६४ या काळात ते भारतीय सैन्यदलाच्या तोफखान्यात बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीचे काम करीत होते. १९६५ ते १९६९ या काळात त्यांनी सोलापूरमधील तत्कालीन खासगी वीज कंपनीत रोजंदारीवर मीटर रीडरचे काम केले. घरी पिढीजात कुंभारकला असल्याने ते त्या कामात घरच्यांना मदत करीत असत.

कुंभार यांना पहिल्यापासूनच पुस्तके व नियतकालिके वाचण्याची आवड होती. त्यांनी लहानपणी विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतले इतिहास संशोधनविषयक लेख वाचले. डॉ. वा. वि. मिराशी यांचे ताम्रपट, शिलालेख व प्राचीन नाणी या विषयांवरील लेख वाचून ते मिराशींना भेटले आणि या विषयात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मिराशींनी त्यासाठी इंग्रजी भाषेत गती, संस्कृतचे ज्ञान व प्राचीन लिप्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. कुंभारांना यांतील काहीच येत नव्हते. मग ते आधी शाळाबाह्य रीतीने एस.एस.सी. उत्तीर्ण झाले, व ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळातील तात्यासाहेब खरे यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून शिलालेखांचा अभ्यास कसा करावा व शिलालेखांचे ठसे कसे घ्यावेत याचे धडे घेतले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →